उन्हातून आल्यावर लगेच पिऊ नये थंड पाणी | पुढारी

उन्हातून आल्यावर लगेच पिऊ नये थंड पाणी

नवी दिल्ली : सध्या उन्हाळ्याने कहर केला असून, अनेक लोकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हामुळे आपल्याला सारखी तहान लागत असल्याने अनेक जण एकदम थंड पाणी पितात. पण, तुम्हाला माहीत आहे का? भर उन्हातून आल्यानंतर तुम्ही लगेच थंड पाणी पित असाल तर आताच थांबवा, कारण याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. याबाबत आरोग्य तज्ज्ञ याबाबत काय सांगतात? ते जाणून घ्या..

सध्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या हवामानात तुम्ही कामानिमित्त थोडा वेळ का होईना बाहेर पडला, तरी तुमचा घसा आणि जीभ कोरडी पडू लागते. त्यामुळे थंड पाणी प्यायल्यावर आपल्याला आराम वाटतो. आपल्यापैकी बहुतेक जण उन्हातून बाहेर पडताच थंडगार पाणी पितात. तुम्हीही असे करत असाल तर आजपासूनच हे करणे बंद करा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हातून आल्या आल्या थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान बिघडते. तुम्ही बाहेरून आल्यावर तुमच्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यात तुम्ही अचानक थंड पाणी पिता, तेव्हा तुम्हाला थंडी आणि उष्णतेची समस्या होते.

त्यामुळे सर्दी, ताप येण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही अचानक थंड पाणी पिता, तेव्हा त्याचा तुमच्या पचनावरही परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला अपचनाची तक्रार होते. तज्ज्ञांच्या मते, थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. थंड पाणी पिणेदेखील तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते, जेव्हा तुम्ही थंड पाणी पितात, तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या उडतात आणि रक्तप्रवाह मंदावतो. अशा स्थितीत हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते. उन्हातून बाहेर पडल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. हे घडते कारण तुमचा ब्रेन फ्रीज होतो. जास्त थंड पाणी प्यायल्याने मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो, ज्यामुळे मेंदू नीट काम करू शकत नाही. जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर तुमच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.

Back to top button