अतिशय गोंडस अन् तितकाच धोकादायक गिनी पिटोहुई! | पुढारी

अतिशय गोंडस अन् तितकाच धोकादायक गिनी पिटोहुई!

पापुआ न्यू गिनी : काही पक्षी दिसायला अतिशय गोंडस, आकर्षक असतात. पण, यातील काही प्रजाती इतक्या विषारी असतात की, त्यांना स्पर्श केला तरी ते अगदी जीवावर देखील बेतू शकते. हुडेड पिटोटुई किंवा गिनी पिटोहुई, हा पापुआ न्यू गिनीमध्ये आढळून येणारा पक्षी देखील याच प्रकारातील आहे. स्थानिक नागरिक या पक्ष्याला ‘रबिश बर्ड’ असे म्हणतात. जगातील सर्वात विषारी पक्ष्यांमध्ये त्याची गणना होते.

बर्डस्पॉटने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, 1990 पर्यंत हा पक्षी विषारी असल्याची कोणतीही विशिष्ट माहिती नव्हती. मात्र, 1990 मध्ये प्रथमच कॅलिफोर्निया अकादमी ऑफ सायन्सेसचे पर्यावरणशास्त्रज्ञ जॅक डंबाचेर यांनी हा पक्षी विषारी असल्याचा शोध लावला.

जॅक पापुआ न्यू गिनीमध्ये या पक्ष्याचा अभ्यास करत होते. त्यावेळी एका जाळ्यातून या पक्ष्याला सोडवण्याचा प्रयत्न करताना चुकून त्यांचा हात कापला गेला आणि तीव्र जळजळ होऊ लागली. काही मिनिटांत हात सुन्न झाला. त्यांनी हाताचं बोट तोंडात टाकलं. काही सेकंदातच त्यांची ओठ आणि जीभ जळू लागली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करावे लागले आणि यानंतर जॅकना कळून चुकले की, त्यांनी जगातील पहिला विषारी पक्षी शोधला आहे.

पुढे दोन वर्षांच्या संशोधनानंतर, 1992 मध्ये या पक्ष्याच्या शरीरात बॅट्राकोटॉक्सिन आहे, जे जगातील सर्वात घातक न्यूरोटॉक्सिन आहे, असे आढळून आले. हाच घातक घटक कोब्रामध्येही असतो. पिटोहुईच्या ऊती, त्वचा आणि पंखांमध्ये हे विष असते. शास्त्रज्ञांच्या मते, जर चुकून पिटोहुईला स्पर्श केला किंवा त्याच्या संपर्कात आला तर त्याचे विष थेट नस आणि स्नायूंवर हल्ला करते. प्रथम स्नायू सुन्न होतात. विषाचा डोस जास्त असल्यास अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

शास्त्रज्ञांच्या मते, हुडेड पिटोहुई हे विष स्वतः तयार करत नाहीत, तर त्यांच्या शरीरातील या विषाचा सर्वात मोठा स्रोत त्यांचं अन्न आहे. हुड असलेली पिटोहुई प्रामुख्याने बीटलची शिकार करतात, ज्यांना मलेरिया बीटलदेखील म्हणतात. ते स्वतः खूप विषारी आहेत. यामधून धोकादायक न्यूरोटॉक्सिन पिटोहुईमध्ये जाते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

Back to top button