चंद्राभोवती फिरत आहे उडती तबकडी?

चंद्राभोवती फिरत आहे उडती तबकडी?

वॉशिंग्टन : पृथ्वीवर उडत्या तबकड्या म्हणजेच 'युफो' किंवा 'अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्' दिसल्याचे दावे अनेक वेळा केले जात असतात. या उडत्या तबकड्यांचा संबंध एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांशी जोडला जात असतो. आता अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने चंद्राभोवती फिरत असलेल्या रहस्यमय सिल्व्हर सर्फबोर्डच्या आकाराच्या वस्तूचे फोटो शेअर केले आहेत. 'नासा'च्या 'लुनार रिकनायसन्स ऑर्बिटर' ने हे फोटो काढले आहे. ती मार्व्हलच्या 'सिल्व्हर सर्फर' बोर्डसारखे दिसणारी वस्तू नक्की काय आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सोशल मीडियावर या रहस्यमयी फोटोची चर्चा सुरू आहे. काहींनी काल्पनिक पात्र सिल्व्हर सर्फरच्या सर्फबोर्डशी या वस्तूची तुलना देखील केली. अर्थात 'नासा'ने ही वस्तू नेमकी काय आहे, याचा खुलासा केला आहे.

'एलआरओ' हे एक अंतराळयान 15 वर्षे चंद्राभोवती फिरत आहे आणि त्याचा अभ्यास करत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्राभोवती फिरणारी 'सर्फबोर्ड-आकाराची' वस्तू दिसत आहे. पण, या रहस्यमय वस्तूचा कॉमिक बुकच्या जगातील किंवा सुपरहिरो चित्रपटांशी किंवा अगदी अज्ञात फ्लाईंग ऑब्जेक्टशी (यूएफओ) काहीही संबंध नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, हे कोरिया एरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटचे र्'दानुरी' हे चंद्रभोवती फिरणारे अंतराळयान आहे.

'एलआरओ' अंतराळयानाने त्याच्या उलट दिशेने प्रवास करताना 'दानुरी'चा फोटो काढला आहे. 'दानुरी' हे चंद्रावर पाठवलेले दक्षिण कोरियाचे पहिले अंतराळ यान आहे म्हणजे डिसेंबर 2022 पासून चंद्राच्या कक्षेमध्ये फिरते आहे. नासाच्या प्रेस नोटनुसार, 'एलआरओ'ने कोरिया एरोस्पेस रिच इन्स्टिट्यूटद्वारे पाठवलेल्या 'दानुरी'चे काही फोटो काढले आहेत. जेव्हा दोन्ही अंतराळयान 5 ते 6 मार्च दरम्यान समांतर रेषेत परंतु विरुद्ध दिशांनी प्रवास करत होते, तेव्हा हे फोटो काढण्यात आले आहेत.

अंतराळ संस्थेने सांगितले की, '2022 पासून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असलेल्या 'दानुरी'चे फोटो काढताना 'एलआरओ' खूप वेगात बाजूने गेल्यामुळे ते 'सिल्व्हर सर्फबोर्ड' सारखे दिसत आहे.' अंतराळ संस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, 'मेरिलँडच्या ग्रीनबेल्टमध्ये गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये 'एलआरओ' संचालन टीमला 'दानुरी'ची एक झलक मिळवण्यासाठी 'एलआरओ' योग्य वेळी, योग्य ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण, दोन्ही अंतराळयानाच्या दरम्यान खूप जास्त वेग होता जो साधारण 11,500 कि.मी. प्रतितास इतका होता, ज्यामुळे हे काम सोपे नव्हते.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news