TAIPEI 101 Tower : ‘ती’ इमारत भूकंपानंतरही सहीसलामत | पुढारी

TAIPEI 101 Tower : ‘ती’ इमारत भूकंपानंतरही सहीसलामत

तैपेई : सर सलामत तो पगडी पचास, असे का म्हणतात, याचा प्रत्यय तैवानमधील भूकंपावेळी एका इमारतीमुळे येतो आहे. काही दिवसांपूर्वीच तैवान 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले. मागील 25 वर्षांतील हा या देशातील सर्वात मोठा भूकंप होता. यात कित्येक इमारती कोसळल्या. भूकंपाने बरेच काही उद्ध्वस्त केले. पण, यानंतरही येथील सर्वात उंच इमारत मात्र अजिबात हललीदेखील नाही. ही इमारत होती तैपेई 101!

तैपेई 101 ही 101 मजल्यांची इमारत एकेकाळी जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जायची. त्यानंतर यापेक्षाही अधिक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. मात्र, तैपेई 101 या इमारतीचे वेगळेपण तेथील भूकंपाने आता अधोरेखित केले आहे. तैवानमध्ये भूकंपाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून 80 मैलांवर ही इमारत आहे. भूकंपामुळे अंदाजे 770 इमारती कोसळल्या; पण ही गगनचुंबी इमारत मात्र तग धरून उभी राहिली. सीएनएनच्या वृत्तानुसार, भूकंपातही उंच उभ्या असलेल्या या इमारतीचे नावीन्यपूर्ण डिझाईन हे तिच्या मजबुतीचे कारण मानले जाते.

आता या इमारतीच्या मजबुतीचे कारण म्हणजे या इमारतीत एक मोठा पेंडुलम आहे. जे ट्यूंड मास डँपर म्हणून ओळखले जाते किंवा याला विंड डॅम्पिंग बॉल असेही म्हणतात. हा पेंडुलम इमारतीत 87 ते 92 व्या मजल्यादरम्यान बसवण्यात आला आहे. ते जमिनीपासून हजार फूट उंचीवर असून, त्याचे वजन 660 मेट्रिक टन आहे.

हा बॉल उंच इमारतींमध्ये बसवला जातो, जेणेकरून इमारतीवरील जोरदार वार्‍याचा प्रभाव कमी करता येईल. त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणेही सोपे होते. अनेक इमारतींमध्ये ते अशा प्रकारे बसवले जातात की, ते बाहेरून दिसत नाहीत. हा बॉल भूकंपाचे धक्के शोषून घेण्यास उपयुक्त आहे. आऊटलेटनुसार हा डँपर भूकंप किंवा जोरदार वार्‍याच्या वेळी इमारतीच्या हालचालींवर प्रतिकार करतो आणि त्यांचा प्रभाव कमी करतो. तैपेई 101 वेबसाईटनुसार, जेव्हा भूकंप, वादळ किंवा अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा हे वर्तुळाकार डँपर समोरून मागे सरकू लागते. अशा प्रकारे ते जोरदार वारा किंवा भूकंपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात शोषून घेते. या डँपरमुळे इमारतीची हालचाल चाळीस टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा डँपरच्या अभियंत्यांनी केला आहे.

Back to top button