

वॉशिंग्टन : 'अपोलो' मोहिमांमध्ये अनेक अंतराळवीर चांद्रभूमीवर जाऊन आले होते. त्यानंतर आता पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची तयारी 'नासा' ने केली आहे. या 'आर्टेमिस' मोहिमेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. शिवाय 'नासा' आता चंद्रावर चालणारी कारही बनवणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच खडतर परिस्थितीतही ही कार आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल. खरे तर एखाद्या गाडीसारख्या दिसणार्या व चालवता येणार्या रोव्हरचा यापूर्वीच चंद्रावर वापर झाला आहे. 'अपोलो-15' मोहिमेत कमांडर डेव्हिड स्कॉट यांनी अशी रोव्हर चंद्रावर पहिल्यांदा चालवली होती.
'नासा' आता चंद्रासाठी रोव्हर नव्हे, तर कार बनवत आहे. या कारला 'लुनार टेरेन व्हेईकल' असे नाव देण्यात आले आहे. चंद्रावर अंतराळवीरांना सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे भ्रमंती करता यावी यासाठी तिची निर्मिती करण्यात येत आहे. 'नासा'मधील संशोधक जेकब ब्लिचर यांनी सांगितले की, चंद्रावर ज्या अतिशय दुर्गम भागात पायी चालत जाणे शक्य नाही, त्या भागांमध्ये एलटीव्ही या कारने अंतराळवीर जाऊ शकतील. त्यामुळे अधिक सखोलपणे संशोधन करणे शक्य होईल.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्यासाठी एलटीव्हीचा मोठा उपयोग होईल. त्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापन, नेव्हिगेशन यंत्रणा, दळणवळणाची अत्याधुनिक साधने बसवण्यात येणार आहेत. संशोधनासाठी, उपकरणांची ने-आण करण्यासाठी, चंद्रावरून विविध गोष्टींचे नमुने गोळा करण्यासाठी एलटीव्हीचा वापर होईल. आर्टेमिस मोहिमेसाठी अंतराळवीर 2026 मध्ये चंद्रावर जाणार आहेत. तोपर्यंत या कारचे काम पूर्ण होईल.