लखनौ : स्मार्टवॉचपासून ते अॅलेक्सापर्यंत अनेक अद्ययावत उपकरणांचा वापर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीही होऊ शकतो हे आतापर्यंत जगभरात विविध उदाहरणांवरून दिसून आले आहे. आपल्या देशातही नुकतीच अशीच एक घटना घडली. उत्तर प्रदेशातील बस्ती येथील 13 वर्षांच्या निकिता हीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने केवळ तिचेच नव्हे, तर पंधरा महिन्यांच्या एका चिमुकलीचेही प्राण वाचले. अॅलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगून तिने आपला व या बालिकेचा जीव वाचवला!
विकास कॉलनीतील आपल्या बहिणीकडे गेलेली निकिता ही तिच्या पंधरा महिन्यांच्या भाचीसमवेत खेळत होती. पहिल्या मजल्यावर किचनजवळील सोफ्यावर निकिता आणि वामिका खेळत होत्या. घरातील अन्य व्यक्ती दुसर्या खोलीत होत्या. त्यावेळी माकडांची एक टोळी घरात घुसली. त्यांनी किचनमधील भांडीकुंडी आणि अन्य वस्तू फेकण्यास सुरुवात केली. माकडांच्या या अचानक आलेल्या संकटाने अर्थातच दोघीही घाबरल्या. छोटी वामिका तर घाबरून रडू लागली आणि निकिताही भेदरली. दरम्यान, एक माकड निकिताच्या दिशेने येऊ लागले. तेव्हढ्यात तिचे लक्ष फ्रीजवर असलेल्या अॅलेक्साकडे गेले. तिने क्षणाचाही वेळ न लावता अॅलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्याचा आदेश दिला. ही आज्ञा मिळताच अॅलेक्साने 'भो-भो' असा आवाज काढण्यास सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून माकड घाबरले आणि त्याने बाल्कनीमधून पोबारा केला.
दरम्यान, अॅलेक्साचा इतका चांगला वापर होऊ शकतो, याचा आम्ही विचारच केला नव्हता, असे कुटुंब प्रमुख पंकज ओझा यांनी या घटनेनंतर सांगितले.