समुद्र किनार्‍यावरील अनोखी चीजवस्तू | पुढारी

समुद्र किनार्‍यावरील अनोखी चीजवस्तू

यॉर्कशायर : उत्खनन करताना अतिशय पुरातन, मौल्यवान वस्तू सापडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली असून, यात एक माणूस समुद्राच्या किनार्‍यावर खोदत असताना त्याला दगडांमध्ये एक गोलाकार वस्तू अडकलेली दिसली. ते तोडताच त्याला त्याच्या आत दडलेलं सुमारे 18 कोटी वर्षे जुने रहस्य सापडले, असा दावा या व्हिडीओत केला गेला आहे. अर्थात, नेहमीप्रमाणे यावरही अनेक वादविवाद सुरू झाले आहेत. काहींना हा व्हिडीओ बनावट असल्याचीही शंका वाटते. मात्र, हा व्हिडीओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे.

व्हिडीओमध्ये सदर व्यक्ती समुद्र किनार्‍यावर उत्खनन करते आणि काही काळ उत्खनन केल्यानंतर तेथे एक दगड आढळतो व तो दगड बाजूला केल्यानंतर गोलाकार वस्तू आढळून येते, असे दिसून येते. हा व्हिडीओ यॉर्कशायर येथील असल्याचे काहींचे म्हणणे आहे. यॉर्कशायर फॉसिल्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. एरॉन व शे अशा दोन व्यक्ती हे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवतात.

व्हिडीओमध्ये असे दिसते की, ती व्यक्ती तो गोल दगड फोडून दुसर्‍या दगडांमधून बाहेर काढते. मग तोही दगड उघडते. आत त्याला दोन जीवाश्म दिसतात. खरं तर, तो गोल दगड स्वतःच एक प्रकारचा जीवाश्म आहे, ज्यामध्ये अमोनाईट्सचे जीवाश्म आहेत जे स्पायरल आकाराचे होते आणि सुमारे 180 दशलक्ष वर्षांपूर्वी या पृथ्वीवर राहत असत. त्याचप्रमाणे, ती व्यक्ती आणखी एक गोल दगड फोडते आणि त्याच्या आतून आणखी एक अमोनाईट जीवाश्म बाहेर येतो. या दगडावर लोखंडी पायराईटचा थर आहे, जो घासल्याने तो खूप सपाट आणि चमकदार बनतो, असे यात सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 11 लाख व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Back to top button