पृथ्वीच्या कवचाचा तुकडा वेगळा होऊन बनला खंड | पुढारी

पृथ्वीच्या कवचाचा तुकडा वेगळा होऊन बनला खंड

लंडन : संशोधकांनी सुमारे 3.75 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या एका भौगोलिक घटनेचा छडा लावला आहे. पृथ्वीचा कर्स्ट म्हणजे वरच्या स्तरातील एक तुकडा वेगळा होऊन प्राचीन खंड बनला होता. संशोधकांनी नद्यांमधील क्रिस्टल्सवर संशोधन करीत असताना हा शोध लावला. या नव्या संशोधनानुसार, एक प्राचीन खंड बनण्यासाठी पृथ्वीच्या क्रस्टचा तुकडाही समाविष्ट होता. क्रस्टच्या अंतर्भागात ‘जिरकॉन’ नावाच्या खनिजाचे स्फटिक बनतात. त्यांच्या मदतीनेच वैज्ञानिकांनी युरोपमधील सर्वात जुने बेडरॉक बनवण्याचे रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे. ग्रीनलँडमधील प्राचीन नदीत 3.75 अब्ज वर्षांपूर्वीचे क्रस्टचे खडक सापडले आहेत.

वैज्ञानिकांनी युरेनियम-लेड, ल्यूटिरियम-हाफनियम आणि ऑक्सिजनच्या मदतीने क्रिस्टल्स म्हणजेच स्फटिकांचे वय जाणून घेतले. त्यानंतर त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना अन्य प्राचीन क्रस्ट तुकड्यांशी केली. विश्लेषणानंतर असे दिसून आले की, क्रस्टचा हा तुकडा किमान 250 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्याची उत्पत्ती ग्रीनलँडमध्ये झाली होती. कोपेनहेगन युनिव्हर्सिटीत याबाबतचे संशोधन झाले. त्यामधून आर्कियन क्रेटन बनण्याच्या आणि वाढण्याच्या क्रियेबाबतची बरीच माहिती समोर आली. आर्कियन क्रेटन महाद्वीपीय क्रस्टचे सर्वात जुने भाग आहेत. त्यांची निर्मिती प्रीकॅम्ब्रियन आर्कियन युगावेळी म्हणजेच 4 अब्ज ते 2.5 अब्ज वर्षांपूर्वीच्या काळात झाली होती. त्यावेळी पृथ्वीवर पहिल्यांदाच जीवसृष्टी विकसित झाली होती. ‘जियोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

या संशोधनानुसार, फिनलँडच्या पुडासजर्वी आणि सुओमुजर्वी क्षेत्रांमध्ये सुरुवातीच्या आर्कियन क्रस्टचे पुरावे सापडले आहेत. कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या परिसरातील नदीच्या वाळूतील जिरकॉन क्रिस्टल्स गोळा केले. त्यांना असे आढळले की, या स्फटिकांमध्ये तसाच आयसोटोप रेकॉर्ड होता जो पश्चिम ग्रीनलँडच्या उत्तर अटलांटिक क्रेटनमधील खडकांमध्ये आहे. यावरून हे दिसते की, फिनलँडच्या क्रस्टचा काही भाग ग्रीनलँडमध्ये बनला होता. फिनलँडमध्ये मिळालेल्या जिरकॉन क्रिस्टल्सचे सिग्नेचर दाखवतात की, ते स्कँडिनेवियामध्ये मिळालेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक जुने आहेत. त्यांचे वय ग्रीनलँडच्या खडकांच्या नमुन्यांइतके आहे. हे सर्व देश क्रस्टच्या फेनोस्कँडियन शील्ड किंवा बाल्टिक शील्ड नावाच्या भागावर आहेत. संशोधकांना वाटते की, हे क्रस्ट ग्रीनलँडपासून तुटून वेगळे झाले आणि कोट्यवधी वर्षांपर्यंत पुढे जात राहिले.

Back to top button