YouTube : यूट्यूबवर ‘एआय’च्या साहाय्याने आले ‘हे’ नवे फीचर | पुढारी

YouTube : यूट्यूबवर ‘एआय’च्या साहाय्याने आले ‘हे’ नवे फीचर

न्यूयॉर्क : सध्याचा जमाना ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा आहे. या ‘एआय’चा वापर अनेक ठिकाणी केला जात आहे. जगभरात व्हिडीओ एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म म्हणून यूट्यूबचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार, यूट्यूब वेळोवेळी अपडेट घेऊन आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने, यूट्यूब आता लवकरच ‘जंप अहेड’ हे ऑप्शन घेऊन येणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते आपल्या आवडीप्रमाणे मजेशीर व्हिडीओ पाहू शकतात. म्हणजेच मनोरंजनासाठी यूझर्सला आता पूर्ण व्हिडीओ बघण्याची गरज नाही. या ऑप्शनवर टॅप केल्यास थेट मनोरंजक भागावर व्हिडीओ जाईल. ज्यांना पूर्ण व्हिडीओ बघण्याचा कंटाळा येतो, त्या लोकांसाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.

यूट्यूब व्हिडीओ फॉरवर्ड करण्यासाठी स्क्रीनवर दोनवेळा टॅप करावे लागते; मात्र आता या पद्धतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एंट्री होणार आहे. व्यक्तीच्या आवडीला ट्रॅक करून व्हिडीओतील मनोरंजक भागांबद्दल अंदाज लावला जाईल. यूझर्सनी या फीचरला सपोर्ट करणार्‍या व्हिडीओवर डबल टॅप केल्यास त्यांना ‘जंप अहेड’ हे ऑप्शन दिसणार आहे. नेहमीप्रमाणे 10 सेकंद पुढे जाण्याऐवजी तुम्ही हे बटण दाबल्यास थेट व्हिडीओतील रंजक भागांकडे हा व्हिडीओ जाईल. अनेकदा एखादी महत्त्वाची बातमी किंवा द़ृश्य मोठ्या कालावधीचे असते, त्यातून आवश्यक भाग शोधणे अतिशय अवघड जाते; पण या फीचरच्या मदतीने त्या माहितीपर्यंत तुम्हाला सहज पोहोचता येईल आणि मनोरंजक भाग तुम्हाला शोधून बघण्याची गरज नाही.

केवळ दर्शकांसाठीच नाही, तर व्हिडीओ क्रिएटर्स या फीचरचा फायदा होणार आहे. जेव्हा लोक व्हिडीओ पाहताना ‘जंप अहेड‘ हे फीचर वापरतील, तेव्हा यूट्यूबला माहिती असते की, व्हिडीओचे कोणते भाग सर्वात जास्त पसंद केले जात आहेत. या माहितीच्या आधारे व्हिडीओ बनवणार्‍यांना समजू शकते की, लोकांना काय आवडते आणि काय नाही. यामुळे लोकांच्या आवडीनुसार व्हिडीओ तयार करणे शक्य होईल. ‘जंप अहेड’ फीचरची चाचणी अंतिम टप्प्यात आहे आणि सध्या ते फक्त यूएसमधील यूट्यूब प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

Back to top button