
भोपाळ : मध्य प्रदेशात खेडी गावातील शेतकरी देवेंद्र दवंडे यांनी शेतीमधील एक अनोखा आविष्कार दर्शवला आहे. त्यांनी एकाच झाडावर पाच प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पादन घेतले. हे शक्य झाले टर्की बेरीच्या रोपामुळे. देवेंद्र यांनी हे रोप तामिळनाडूतून मागवले होते. त्यांनी या रोपामध्ये ग्राफ्टिंग तंत्राचा म्हणजेच कलम करण्याच्या पद्धतीचा वापर केला. यामुळे एका झाडावर दोन प्रकारची वांगी आणि दोन प्रकारचे टोमॅटो आले होते. आता या झाडावर तीन प्रकारची वांगी आणि दोन प्रकारचे टोमॅटो येत आहेत.
कमी जागेत अधिक फळभाज्यांचे उत्पादन कसे घेता येईल, याबाबत देवेंद्र यांचा हा प्रयोग आदर्श ठरू शकतो. तीन महिन्यांपूर्वीच देवेंद्र यांनी कृषी वैज्ञानिकांकडून कलम करण्याच्या पद्धतीचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी दोन रोपे लावली होती. त्यांच्यामध्ये आधी हिरव्या व काळ्या वांग्याचे कलम करण्यात आले. त्यानंतर देशी टोमॅटोचेही कलम केले. आता त्यामधून चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
कृषी वैज्ञानिक आर. डी. बारपेठे यांनी सांगितले की, ग्राफ्टिंग एक मान्यताप्राप्त आणि प्रभावी तंत्र आहे. त्यामध्ये एकाच झाडावर अनेक झाडांचे कलम करता येऊ शकते. जी झाडे रोगांशी लढू शकतात, त्यांच्यामध्ये कमजोर झाडांचे कलम केल्यावर त्यांनाही संरक्षण मिळते. ग्राफ्टिंगमुळे पाणी आणि खाद्याची अधिक गरज लागत नाही. तसेच कमी जागेत फळभाज्यांचे अधिक उत्पादन घेता येऊ शकते.