

वॉशिंग्टन : जगातील बडे टेक दिग्गज असलेल्या अॅलन मस्क यांच्या ब्रेन चिप बनवणारी कंपनी 'न्यूरालिंक'ची थक्क करणारी कामगिरी आता एका नव्या व्हिडीओतून समोर आली आहे. या व्हायरल व्हिडीओत दिसते की, एक व्यक्ती ऑनलाईन बुद्धिबळ खेळत आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती लकवाग्रस्त आहे; पण न्यूरालिंकच्या ब्रेन चिपच्या सहाय्याने ती मेंदूच्या इशार्यावरच हा खेळ खेळत आहे!
या रुग्णाचे नाव आहे नोलँड अरबॉ. पाण्यात डायव्हिंग करीत असताना एका दुर्घटनेमुळे त्यांचे शरीर खांद्यापासून खाली लकवाग्रस्त बनले होते. आता त्यांनी या चिपच्या मदतीने लॅपटॉपवर बुद्धिबळाचा खेळही खेळून दाखवला आहे. न्यूरालिंक चिपचा वापर करीत त्यांनी हवा तसा कर्सर फिरवून हा खेळ खेळला. कंपनीने म्हटले आहे की या चिपचे मेंदूत प्रत्यारोपण केल्याने लोक केवळ आपल्या विचारांचा वापर करून कॉम्प्युटरचा कर्सर किंवा कीबोर्ड नियंत्रित करू शकतात.
या रुग्णानेही शानदाररीत्या हा खेळ खेळून दाखवल्यावर न्यूरालिंकचे सीईओ अॅलन मस्क यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'लाईव्हस्ट्रीम न्यूरालिंक टेलिपथीचे प्रदर्शन, कॉम्प्युटरला नियंत्रित करणे आणि केवळ विचारानेच खेळ खेळणे'. न्यूरालिंकच्या अधिकृत एक्स प्रोफाईलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दिसते की नोलँड आपल्या समोर ठेवलेल्या लॅपटॉपवर बुद्धिबळ आणि गेम सिव्हीलायझेशन-6 खेळण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये केवळ विशिष्ट विचार आणून त्याचा कर्सर हलवण्यासाठी वापर करीत आहे.