असेही महाविद्यालय; विद्यार्थ्यांना वर्गातही घालावे लागते हेल्मेट! | पुढारी

असेही महाविद्यालय; विद्यार्थ्यांना वर्गातही घालावे लागते हेल्मेट!

रांची : सध्याच्या घडीचे शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुलाने उत्तम शिकावे, सुसंपन्न व्हावे, व्यवहार शिकावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते आणि त्या द़ृष्टीने त्यांचे प्रयत्नही असतात. अशासाठी उत्तम शाळा, कॉलेज निवडावे, तिथे प्रवेश घ्यावा ही कसरत शिक्षण पूर्ण होईतोवर अव्याहतपणे सुरू असते. साहजिकच उत्तमोत्तम शिक्षण संस्था निवडण्यावर साहजिकच पालकांचा भर असतो. झारखंडमधील एक अनोखे महाविद्यालय मात्र असेही आहे, जेथे चक्क वर्गात हेल्मेट घालून बसावे लागते. हेल्मेट घातले तरच इथले वर्ग सुरू होतात. अन्यथा विद्यार्थ्याला बसूही दिले जात नाही. असे का केले जाते, याचे कारणही अर्थातच बरेच रंजक आहे.

आता सर्वप्रथम वाटेल की, हा महाविद्यालयाचा ड्रेस कोडसारखा हेल्मेट कोड असेल; तर असे अजिबात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही येथे वर्गात हेल्मेट घालून बसावे लागते. यापैकी कोणी हेल्मेट परिधान केले नसेल तर वर्ग सुरूही होत नाही आणि याचे कारण म्हणजे या महाविद्यालयाची जीर्ण झालेली, कोणत्याही क्षणी कोणताही भाग कोसळू शकेल, अशा अवस्थेत असलेली मोडकळीस आलेली इमारत!

या महाविद्यालयाच्या इमारतीचे काही कोपरे यापूर्वीच ढासळले आहेत तर काही भाग कोणत्याही क्षणी कोसळेल, अशा स्थितीत आहेत. यामुळे विद्यार्थी अन्य कोणत्याही कारणामुळे नव्हे तर आपल्या सुरक्षिततेसाठी वर्गात हेल्मेट घालून बसतात.

अलीकडेच याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी देखील नाईलाज व्यक्त केला आहे. इमारतीला 70 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून याबाबत प्रशासनाला त्यांनी पूर्ण कल्पना दिलेली आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि या परिस्थितीत वर्ग जैसे थे सुरू ठेवण्याशिवाय त्यांच्याकडेही काहीही पर्याय बाकी राहिलेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वर्गात हेल्मेट घालून बसणे भाग ठरत आले आहे.

Back to top button