

सॅन फ्रान्सिस्को : मारिया ब्रन्यास मोरेरा यांनी अलीकडेच आपला 117 वा वाढदिवस थाटात साजरा केला आणि गिनिज रेकॉर्डस्मध्ये स्थानही प्राप्त केले. त्या आता पृथ्वीतलावर हयात असलेल्या सर्वात वयस्कर व्यक्ती ठरल्या आहेत. 1907 मध्ये जन्मलेल्या मारिया यांनी आपल्या हयातीत पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, स्पॅनिश फ्ल्यूचे जागतिक संकट व कोरोनाची महामारी प्रत्यक्ष अनुभवली असून आता त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे गुपित उलगडले आहे.
मारिया यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. पण, नंतर वयाच्या आठव्या वर्षी त्या कुटुंबीयांसह स्पेनमध्ये स्थलांतरित झाल्या. सध्या त्या कॅटालोनिया येथील एकाच नर्सिंग होममध्ये मागील 23 वर्षांपासून राहात आहेत, असे गिनिज रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर म्हटले.
मारिया मोरेरा यांनी यावेळी गिनिज रेकॉर्डच्या पदाधिकार्यांशी संवाद साधताना कुटुंबीय, नातेवाईकांशी स्नेह, निसर्गाची आवड, भावनिक स्थैर्य, ना चिंता, ना पश्चात्ताप, फक्त सकारात्मता आणि नकारात्मक लोकांशी शक्य तितके दूर राहणे हे आपल्या दीर्घायुष्याचे गुपित असल्याचे सांगितले. आपला 117 वा वाढदिवस देखील त्यांनी आपले कुटुंबीय, हितचिंतक व निकटवर्तीयांसह साजरा केला. मारिया जिथे राहतात, त्या नर्सिंग होमचे संचालक इव्हा कॅरेरा बोईक्स यांनी मारियापासून आपण सर्वांनी खूप काही शिकण्यासारखे असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.
गिनिज रेकॉर्डने ही पोस्ट सोमवारी रात्री उशिरा शेअर केली आणि त्यानंतर काही तासांतच याला लाखांहून अधिक व्ह्यूज, लाईक्स मिळाले होते. दोन्ही महायुद्धे आणि स्पॅनिश फ्ल्यूच्या साक्षीदार असलेल्या मारिया यांना 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली, त्यावेळी त्या 112 वर्षांच्या होत्या. मात्र, या दुर्धर आजारातूनही यशस्वी मार्ग काढण्यात काही दिवसांतच त्या यशस्वी झाल्या.