तेथे गाणे हेच प्रत्येकाचे ‘नाव’!
शिलाँग : मेघालयात काँगथाँग नावाचे एक असे अनोखे गाव आहे, जेथील एकही व्यक्ती नावाने ओळखली जात नाही. या गावात प्रत्येक व्यक्तीसाठी एक गाण्याची धून तयार केली जाते आणि हीच त्या व्यक्तीची आयुष्यभराची ओळख बनते. या अजब गावाची लोकसंख्या 650 च्या आसपास आहे. या गावातील रहिवाशांना नावाबरोबरच एका खास धूनने ओळखले जाते. या अनोख्या प्रथेमुळे हे गाव 'द व्हिसलिंग व्हिलेज' अर्थात शिटी वाजविणारे गाव म्हणूनदेखील नावारूपास आले आहे.
या गावातील लोकांना कागदोपत्री व्यवहारासाठी नाव असतेच. पण, त्या शिवाय प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र धून तयार केली जाते आणि ही धून हीच त्या व्यक्तीची ओळख असते. ही धून वाजवूनच त्या व्यक्तीला हाक दिली जाते. नवजात बाळाच्या जन्मानंतर त्या बाळासाठी धून बसवली जाते आणि ही धून त्या बाळाची आयुष्यभराची ओळख बनते. मेघालयात अशा प्रकारच्या गाण्यांना 'जिंगवई इयॉबी' या नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ आजीचे गाणे असा होतो.

