कॅनबेरा : 'वोलेमी पाईन्स' या प्रजातीची झाडे वीस लाख वर्षांपूर्वी लुप्त झाली असे मानले जात होते. या झाडांचा ऑस्ट्रेलियात 1994 मध्ये अपघातानेच पुन्हा एकदा शोध लागला. आता संशोधकांनी झाडांची ही जवळजवळ लुप्त झालेली प्रजाती पुन्हा एकदा पृथ्वीतलावर वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 'जिवंत जीवाश्म' असे म्हटल्या गेलेल्या या झाडाच्या बिया वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी पेरण्यात आल्या आहेत.
या प्रजातीला 'वोलेमिया नोबिलिस' असे वैज्ञानिक नाव आहे. सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी झाडांची ही प्रजाती बहुतांशी नष्ट झाल्याचे समजले जाते. क्रेटाशियस काळातील म्हणजेच 145 दशलक्ष ते 66 दशलक्ष काळामधील त्यांचे जीवाश्म दर्शवतात की, त्यांच्यामध्ये आजपर्यंत अतिशय तुरळक बदल घडले. ऑस्ट्रेलियाच्या ब्लू माऊंटनवर 1994 मध्ये काही गिर्यारोहकांना या प्राचीन झाडांसारखी काही झाडे आढळून आली.
सध्या त्यापैकी केवळ 60 झाडेच वोलेमी नॅशनल पार्कमध्ये शिल्लक आहेत. त्यांना वणव्यांचा व अन्यही काही गोष्टींचा धोका आहे. प्रागैतिहासिक काळापासून ही झाडे अस्तित्वात असल्याने त्यांना 'जिवंत जीवाश्म' असे म्हटले गेले. आता त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता वोलेमी नॅशनल पार्कमध्येच तीन ठिकाणी त्यांच्या बिया पेरून त्यांची उगवण करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.