Potato Milk : बटाट्याचे पौष्टिक दूध; कोलेस्टेरॉल फ्री, हाडांसाठीही लाभदायक

Potato Milk
Potato Milk

हल्ली जगभरातील अनेक लोक 'वेगन' बनत आहेत. हे 'वेगन' लोक केवळ शाकाहारीच असतात असे नाही तर ते कोणताही पशुजन्य आहारही घेत नाहीत. त्यांना अंडीच नव्हे तर दूध व दुधाचे पदार्थही नको असतात. असे लोक पशुजन्य दुधाला वेगवेगळे पर्याय शोधत असतात. सोया मिल्क, अल्मंड मिल्कसारखे काही पर्याय सध्या उपलब्धही आहेत. आता त्यामध्ये बटाट्याच्या दुधाचीही Potato Milk भर पडलेली आहे. बटाट्याचेही दूध असते हे एरवी आपल्या ऐकिवातही नव्हते, पण आता हे दूध लोकप्रियही होत आहे. शिवाय ते अतिशय पौष्टिकही असते असे तज्ज्ञ सांगतात! बटाटा उकडून त्याच्यापासून असे दूध बनवले जाते. या दुधाचे हे काही उपयोग…

पशुजन्य दुधाला पर्याय : काही लोकांना गायी-म्हशीचे किंवा अन्य पशुजन्य दूध व दुग्धजन्य उत्पादने पचण्यास अडचणी येतात. त्याचे कारण लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा ग्लुटेन संवेदनशीलता हे असते. पोटॅटो मिल्क Potato Milk अशा लोकांसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

हाडांसाठी लाभदायक : सध्या हाडे कमजोर होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसत आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत या समस्येची व्याप्ती आहे. बटाट्याचे दूध यावर उपाय ठरू शकते. या दुधात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते. या दुधाच्या सेवनाने लहान मुलांचे आरोग्यही चांगले राहते.

पोषक घटक : पोटॅटो मिल्कमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी6 सारखे पोषक घटक असतात. शरीराच्या आरोग्यासाठी हे सर्व घटक अतिशय उपयुक्त ठरतात.

लो-कॅलरी : बटाट्याचे दूध हे डेअरी मिल्कच्या तुलनेत कमी कॅलरीजचे असते. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत मिळते. त्यामुळे जे लोक वजन घटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना हे दूध उपयुक्त ठरू शकते.

कोलेस्टेरॉल फ्री : बटाट्याचे दूध हे फॅट फ्री आणि कोलेस्टेरॉल फ्री असते. त्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते. नियमितपणे त्याचे सेवन केल्याने शरीराला अन्यही अनेक लाभ मिळतात; मात्र बटाट्याची अ‍ॅलर्जी किंवा अन्य काही समस्या असणार्‍यांनी त्याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news