लाल शाईने लिहिण्याची बंदी असणारा देश! | पुढारी

लाल शाईने लिहिण्याची बंदी असणारा देश!

सेऊल : वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या परंपरा असतात. काही देशांमध्ये हिरव्या पेनने लिहिणे शुभ मानतात. काही देशांत फक्त निळ्या शाईनेच लिहितात. बर्‍याच जणांना काळ्या शाईने लिहिणेही पसंत असत नाही. मात्र, एक देश असाही आहे, जेथे चक्क लाल शाईने लिहिण्यावर बंदी आहे आणि हा देश आहे दक्षिण कोरिया!

या देशात समाजाच्या दृष्टीने देखील हे खूप वाईट मानले जाते. लाल शाईने एखाद्याचे नाव लिहिले तर त्या व्यक्तीचे आयुष्य कमी होते, अशी या देशातील लोकांची अंधश्रद्धा आहे. येथील लोक लाल शाईचा पेन वापरत नाहीत. अगदी तो घरात देखील घेऊन येत नाहीत. शतकानुशतके येथील लोक ही परंपरा पाळत असून, ती एक प्रकारची अंधश्रद्धा असल्याचा दावाही अनेकांकडून करण्यात येत आला आहे.

गून टू कोरियाच्या वृत्तानुसार, लाल शाईने लिहिल्याने कोणाचेही आयुष्य कमी होत नाही. पण, तरीही अगदी मुलांनाही शाळेत लाल शाईचा पेन वापरू दिला जात नाही. याच प्रमाणे पोर्तुगालमध्ये देखील लाल शाईने लिहिणे अशुभ मानले जाते. जपानमध्येही अशाच प्रकारची अंधश्रद्धा आहे; पण आता हळूहळू ती कमी होत आहे. लाल रंग हा मृत्यूचं प्रतीक असल्याचा दावा ऐतिहासिक पुराव्यांमधून करण्यात येतो. तसेच कोरियन युद्धादरम्यान मृत नागरिकांची व युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे लिहिण्यासाठी लाल शाईचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे लाल शाई ही अशुभ घटनांशी जोडली गेली असून, ती वापरण्यास टाळाटाळ करण्यात येते, असे यामागील कारण मानले जाते.

Back to top button