युरोपचे दोन टन वजनाचे सॅटेलाईट झाले नष्ट

युरोपचे दोन टन वजनाचे सॅटेलाईट झाले नष्ट

लंडन : युरोपियन स्पेस एजन्सीचे एक सॅटेलाईट पृथ्वीच्या वातावरणात येऊन नष्ट झाले आहे. त्याचा वापर हवामानाच्या निगराणीसाठी केला जात होता. दोन टन म्हणजेच 2 हजार किलोग्रॅम वजनाच्या या सॅटेलाईटचे नाव 'ईआरएस-2' असे आहे. प्रशांत महासागराच्या वरती पृथ्वीच्या वातावरणात हे सॅटेलाईट जळून गेले. त्याचे तुकडेही पृथ्वीवर पोहोचले नाहीत. युरोपियन स्पेस एजन्सीने 'ईआरएस-2' च्या जोडीला 1990 च्या दशकात लाँच केले होते. त्यांचे काम वातावरण, जमीन आणि महासागरांचे निरीक्षण करणे हे होते.

या दोन्ही सॅटेलाईटस्नी पूर, वेगवेगळे खंड आणि महासागरांचे तापमान, हिमस्खलन, भूकंपावेळी जमीन सरकणे याबाबतचा डेटा वैज्ञानिकांना दिला होता. 'ईआरएस-2' ने विशेषतः पृथ्वीचे संरक्षण करणार्‍या ओझोन स्तराचे आकलन करण्यासाठी नवी क्षमता सादर केली होती. हे सॅटेलाईट अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळणार याची माहिती आधीच संशोधकांना होती. मात्र, त्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नव्हता.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते जळून जाणार हे स्पष्ट होते. एखाद्या विशिष्ट ठिकाणीच त्याला पाडण्याइतके त्याच्यामध्ये इंधनही नव्हते. रडारच्या सहाय्याने त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. युरोपियन स्पेस एजन्सीच्या माहितीनुसार अमेरिकेत कॅलिफोर्नियापासून सुमारे 2 हजार किलोमीटर पश्चिमेस अलास्का आणि हवाई बेटांच्या दरम्यान उत्तर प्रशांत महासागरावर हे सॅटेलाईट जळून गेले. युरोपमध्ये त्याला 'कृत्रिम उपग्रहांचा दादा' म्हटले जात असे. त्याला 2011 मध्येच निवृत्त केले होते. ते पृथ्वीपासून 780 किलोमीटर उंचीवर होते. कालांतराने संशोधकांनी त्याची उंची कमी करून ते 570 किलोमीटर उंचीपर्यंत खाली आणले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news