‘या’ ठिकाणाला म्हणतात ‘डायनासोरची राजधानी’ | पुढारी

‘या’ ठिकाणाला म्हणतात ‘डायनासोरची राजधानी’

टोरांटो : एके काळी या पृथ्वीतलावर डायनासोरच्या विविध प्रजातींचेच साम्राज्य होते. कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राज्य करणार्‍या या डायनासोरचा र्‍हास पृथ्वीला धडकलेल्या एका लघुग्रहामुळे झाला. आता त्यांचे जगभरातील विविध ठिकाणी जीवाश्म आढळत असतात. मात्र, एका ठिकाणी त्यांचे इतके जीवाश्म आढळले आहेत की या ठिकाणाला ‘डायनासोर जीवाश्मांची राजधानी’ असेच म्हटले जाते. कॅनडाच्या अल्बर्टामधील ड्रमहेलर नावाचे हे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे.

अल्बर्टामध्ये जीवाश्मांच्या शोधासाठी जमिनीत अधिक उत्खनन करावे लागत नाही. तिथे बर्‍याच वेळा डायनासोरचे जीवाश्म जमिनीबाहेरही डोकावलेले असतात. रॉयल टायरेल म्युझियम ऑफ पेलियोन्टोलॉजी येथे तेथील काही अनोख्या जीवाश्मांना ठेवण्यात आले आहे. हे जगप्रसिद्ध प्रागैतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आणि संशोधन केंद्र आहे. याठिकाणी दरवर्षी 4,30,000 पेक्षाही अधिक लोक येत असतात. रॉयल टायरेलचे जीवाश्म वैज्ञानिक डॉ. जिम गार्डनर यांनी सांगितले की याठिकाणी इतके जीवाश्म मिळण्याचे कारण 7.5 कोटी वर्षांपूर्वीच्या स्थितीत दडलेले आहे. त्यावेळी ही जमीन आजच्यापेक्षा वेगळ्या स्थितीत म्हणजेच अर्ध-उष्ण कटिबंधीय तटीय मैदानाच्या स्वरूपातील होती.

असे वातावरण व जमीन ही डायनासोर, मगरी, उडणारे सरीसृप आणि अन्य जीवांसाठी पोषक ठरत असते. मृत्यूनंतरही डायनासोरचे अवशेष संरक्षित करण्यासाठी ही जमीन उपयुक्त ठरली. वादळे, महापूर यामुळेही त्या काळात डायनासोरचा मोठ्या प्रमाणात र्‍हास झाला. त्यांचे देह मोठ्या प्रमाणात पाण्याच्या तळाशी असलेल्या जमिनीत दबले गेले. पाण्यामुळेच त्यांच्या शरीराचे जीवाश्मीकरण होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनांच्या या चक्रामुळे अल्बर्टा हे जगातील सर्वात प्रमुख डायनासोर हॉटस्पॉट बनले. पाण्यानेच त्यांचे शव बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Back to top button