न्यूयॉर्क : सर्वात उंच पुरुष आणि जगातील सर्वात बुटक्या महिलेची सहा वर्षांनंतर आता पुन्हा एकदा भेट झाली आहे. तुर्कीयेचा सुलतान कोसेन आणि भारताची नागपूरमधील ज्योती आमगे यांची यापूर्वी इजिप्तच्या पिरॅमिडसमोर भेट झाली होती. दोघांच्याही नावांची नोंद गिनिज बुकमध्ये आहे. आता सहा वर्षांनंतर दोघे पुन्हा एकदा अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये भेटले!
सुलतान कोसेन हा जगातील सर्वात उंच पुरुष आहे. ज्योती आमगे ही जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे. 2 फूट 1 इंच उंचीची ज्योती आमगे एखाद्या चिमुरड्या बालिकेसारखी दिसत असली तरी तिचे सध्याचे वय तीस वर्षांचे आहे. ज्योती 'बिग बॉस 6' आणि अमेरिकन हॉरर टी.व्ही. मालिकेत झळकली आहे. सुल्तान कोसेन याची उंची 8 फूट 3 इंच म्हणजेच 251 सेंमी आहे. आता तो 41 वर्षांचा आहे.
या भेटीसाठी सुलतानने पांढर्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती, त्यांनी हा लूक काळ्या रंगाच्या ब्लेझरने पूर्ण केला. ज्योती आमगेने या भेटीसाठी हल्क्या हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. मोकळे केस, गुलाबी रंगाचे शूज आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला. या दोघांचे एकत्रित फोटो आता सर्वत्र झळकत आहेत.