सर्वात चमकदार कृष्णविवराचा शोध | पुढारी

सर्वात चमकदार कृष्णविवराचा शोध

लंडन : प्रचंड आकर्षण शक्ती असलेली भली मोठी पोकळी म्हणजे कृष्णविवर. एखाद्या तार्‍याचा मृत्यू झाला की असे ब्लॅकहोल्स म्हणजेच कृष्णविवरे बनत असतात. त्यांच्या तावडीतून प्रकाशाचा किरणही सुटत नाही. सर्व काही गिळंकृत करणारी अशी कृष्णविवरे त्यामुळेच अंधारात लपून राहत असतात. मात्र, आता सर्वात उजळ किंवा प्रकाशमान अशा कृष्णविवराचाही शोध लावण्यात आला आहे. कृष्णविवरे काही गोष्टी उत्सर्जितही करीत असतात. हे कृष्णविवर रोज आपल्या सूर्याइतकी सामग्री उत्सर्जित करीत असल्याने ते उजळ आहे.

या कृष्णविवराला ‘जे 0529-4351’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या 17 अब्ज ते 19 अब्ज वस्तुमानाइतके आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. याचा अर्थ त्याची निर्मिती ही ब्रह्मांडाच्या निर्मितीनंतर केवळ 1.5 अब्ज वर्षांनी झाली होती. कृष्णविवरांचा विस्तार आजुबाजूच्या सर्व गोष्टी गिळंकृत करीत होत असतो. मग ते वायू असोत, धुळ, तारे, ग्रह किंवा अन्य कृष्णविवर असो. प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानीही एक कृष्णविवर असतेच.

आपल्याही ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागी ‘सॅजिटेरियस बी’ नावाचे कृष्णविवर आहे. अशा कृष्णविवरांमध्ये फिरत असलेल्या सामग्रीमध्ये घर्षण होऊन त्याची उष्णता निर्माण होते. त्याचा प्रकाश टेलिस्कोपच्या सहाय्याने पकडता येऊ शकतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘गैया’ यानाच्या दुर्बिणीने या कृष्णविवराचा असाच छडा लावला आहे.

Back to top button