अवघ्या 20 मिनिटांत सायकल बनते इलेक्ट्रिक सायकल! | पुढारी

अवघ्या 20 मिनिटांत सायकल बनते इलेक्ट्रिक सायकल!

हिसार : हरियाणातील हिसार येथे राहणार्‍या गुरसौरभ सिंह या अवलियाने असे किट तयार केले आहे, ज्यामुळे अवघ्या 20 मिनिटांतच कोणत्याही सायकलचे रुपांतर इलेक्ट्रिक वाहनात केले जाऊ शकते. असे इलेक्ट्रिक वाहनात रुपांतर करण्यासाठी किट तयार करण्याची कल्पना रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून सुचली, असे गुरसौरभने यावेळी सांगितले. या प्रकारच्या बदलात कोणत्याही प्रकारचे कटिंग करावे लागत नाही आणि त्याचप्रमाणे मोल्डिग, फॅब्रिकेशनसारखी फार मोठीही प्रक्रिया करावी लागत नाही, असे तो म्हणतो.

आपल्या या अनोख्या किटबद्दल गुरसौरभने सविस्तर माहिती देताना सांगितले की, मी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतचा सर्व विचार केला. अगदी लॉकडाऊन कालावधीपासूनच वेगवेगळे विचार माझ्या मनात घोळत होते. एखादी पायी चालणारी व्यक्ती असेल तर तासाभरात 4 ते 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले जाऊ शकत नाही, हे माझ्या लक्षात आले. पण, पेट्रोलचा खर्च टाळण्यासाठी व सातत्याने सर्व्हिसिंगचा खर्च टाळण्यासाठी चाकोरीबाहेरील प्रयत्न करणे गरजेचे होते.

त्या अनुषंगातून मी रेट्रोफिटिंग शिकून घेतले. या माध्यमातून प्रतितास 25 किमी रिक्षा चालवणे सहज शक्य होते, ते त्यातून दिसून आले आणि त्यानंतर मी कोणत्याही साध्या सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रुपांतर करणे सुरू केले. हा प्रयोग यशस्वी झाल्याचा मला विशेष आनंद आहे.

Back to top button