

अॅमस्टरडम : मानव व रोबो संबंधांवर आधारित फँटसी चित्रपट, कथानके, डॉक्युमेंटरीज तर बरीच तयार होत असतात. पण, असे स्नेह आता प्रत्यक्षातदेखील उतरण्याच्या तयारीत आहेत. नेदरलँडस्मधील अॅमस्टरडम येथे राहणारी स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिस ही एआय जनरेटेड होलोग्रामशी विवाहाच्या तयारीत आहे. तिचा भावी पती हा चक्क होलिग्राफिक तंत्र व मशिन लर्निंगसह तयार करण्यात आलेले डिजिटल युनिट आहे.
फ्रेमिस ही एआय जनरेटेड डिजिटल युनिटशी विवाहबद्ध होणारी पहिली महिला ठरेल, असे मानले जाते. आपल्या या अभिनव विवाहासाठी तिने ठिकाण निश्चित केले आहे. तिच्या वाग्दत्त पतीचे नाव अॅलेक्स असे निश्चित केले गेले आहे. फ्रेमिसच्या माजी पार्टनरच्या प्रोफाईलप्रमाणे या डिजिटल युनिटची जडणघडण केली गेली आहे. ही हायब्रिड जोडी हा एक नवा प्रकल्प असून, या माध्यमातून फ्रेमिसला एआयच्या युगातील प्रेम, अंतरंग आणि ओळखीच्या सीमारेषांबाबत काही प्रयोग राबवून पहायचे आहेत.
कलात्मक डॉक्युमेंटरी करणे हे माझे लक्ष्य आहे. होलिग्रामचा रोजच्या जगरहाटीत कसा समावेश होऊ शकतो, यावर माझा भर असणार आहे, असे फ्रेमिस याबद्दल अधिक तपशीलवार बोलताना सांगते. तिने इन्स्टाग्रामवर या नव्या डिजिटल जोडीदारासह आपले एक छायाचित्र देखील शेअर केले आहे. एलिसिया फ्रेमिस रॉटरडॅम शहरात लवकरच विवाहबद्ध होईल, असे सध्याचे संकेत आहेत.