

मॉस्को : जगात श्रीमंत लोकांची कमी नाही. कोट्यवधी आणि अब्जावधींच्या मालमत्तेचे मालक हजारो लोक आहेत आणि अनेक अहवाल असेही दर्शवतात की, जगात अब्जाधीशांची संख्या सतत वाढत आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सध्या बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्यानंतर मस्कचे नाव येते. या कोट्यधीशांची संपत्ती इतकी अफाट आहे की, त्यांनी दररोज करोडो रुपये खर्च केले तरी ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सर्व पैसे खर्च करू शकणार नाहीत. मात्र, जगात अशी एक व्यक्ती आहे, जी केवळ दोन मिनिटांसाठी इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली होती आणि या व्यक्तीची श्रीमंतीदेखील केवळ दोन मिनिटेच टिकून राहिली!
त्या व्यक्तीच्या खात्यात इतके पैसे आले, जितके बर्नार्ड अर्नाल्ट आणि एलोन मस्क यांनी स्वप्नातही पाहिले नसतील. असे बरेच लोक असतील ज्यांना लॉटरी जिंकून एका झटक्यात लक्षाधीश व्हावे आणि नंतर आरामात जीवन जगावे, असे वाटते. क्रिस रेनॉल्ड्स या व्यक्तीबाबतही असेच घडले. एके दिवशी क्रिसने पेपाल खाते उघडले आणि त्याच्या खात्यात एकूण 92 क्वाड्रिलियन डॉलर्स इतके पैसे जमा झाले.
हे पैसे किती होते, याचा अंदाज यावरून लावू शकता की, क्रिस हा तेव्हाचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कार्लोस स्लिम यांच्यापेक्षा 10 लाख पटीने श्रीमंत झाला होता. त्यावेळी कार्लोस स्लिमची एकूण संपत्ती 67 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 5,559 अब्ज रुपये होती. मात्र, क्रिसची ही श्रीमंती केवळ दोन मिनिटेच टिकली. कारण, हे सारे काही पेपाल कंपनीच्या चुकीमुळे घडले होते. या कंपनीला लवकरच आपली चूक लक्षात आली, त्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली आणि क्रिसची माफीही मागितली. माध्यमांनी यानंतर क्रिसला गराडा घातला आणि त्याला एकच विचारले, हे पैसे खरेच मिळाले असते तर त्याचे काय केले असते? क्रिसचे उत्तरही लाजवाब होते. तो म्हणाला, मी देशाचे संपूर्ण कर्ज फेडले असते!