रेडिएशननंतरही चेर्नोबिलमधील लांडगे, कुत्री सुरक्षित | पुढारी

रेडिएशननंतरही चेर्नोबिलमधील लांडगे, कुत्री सुरक्षित

वॉशिंग्टन : चेर्नोबिल दुर्घटनेला जगातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानले जाते. याठिकाणी 1986 मध्ये मोठी आण्विक आपत्ती आली होती. त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र रिकामे करण्यात आले होते. मात्र, तिथे काही श्वान मागे राहिले होते. आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, याठिकाणी राहणार्‍या करड्या रंगाच्या लांडग्यांमध्ये जेनेटिक म्युटेशन म्हणजेच जनुकीय सुधारणा झाली आहे. याठिकाणी युक्रेनच्या आसपासच्या क्षेत्रांच्या तुलनेत लांडग्यांची संख्या सात पट अधिक आहे. तेथील कुत्र्यांनीही या आपत्तीमधील रेडिएशनवर मात केल्याचे दिसून आले आहे. या लांडग्यांना किंवा कुत्र्यांना रेडिएशनमुळे कर्करोग जडला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून संशोधक याठिकाणी लांडगे तसेच रेडिएशनवेळी मागे राहिलेल्या कुत्र्यांच्या वंशजांचा अभ्यास करीत आहेत. या आण्विक आपत्तीनंतर 35 वर्षांनीही या प्राण्यांनी स्वतःला कर्करोगापासून वाचवले आहे. प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या जैववैज्ञानिक कारा लाव यांनी एक दशकापासून या लांडग्यांचा व कुत्र्यांचा अभ्यास केला आहे. त्यांना आढळले की, या प्राण्यांची रोगप्रतिकारक यंत्रणा बदलली आहे. ही यंत्रणा हाय रेडिएशनमधून जाणार्‍या कर्करोगाच्या रुग्णांसारखी आहे.

गेल्या महिन्यात वॉशिंग्टनमध्ये एका जीव विज्ञान बैठकीत लव यांनी आपल्या संशोधनाची माहिती दिली. चेर्नोबिलमधील लांडगे व कुत्रे अनेक पिढ्यांपासून त्यांच्या शरीरात रेडिएशनशी संबंधित कण असूनही जिवंत राहून आपले आयुष्य जगतात. लव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 2014 मध्ये चेर्नोबिल एक्सक्लुजन झोनमधून या प्राण्यांच्या रक्ताचे काही नमुने आणून त्यांचा अभ्यास केला होता. त्यामधून या प्राण्यांनी आपल्या जनुकीय रचनेतच काही सुधारणा घडवून आणून आपली रोगप्रतिकारक क्षमता अधिक बळकट केल्याचे दिसून आले, जेणेकरून त्यांना रेडिएशनमुळे निर्माण झालेल्या कर्करोगाच्या धोक्याची बाधा झाली नाही.

Back to top button