शेवग्यात दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम | पुढारी

शेवग्यात दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम

नवी दिल्ली : शेवग्याच्या शेंगा, पाने ही सर्वच अतिशय आरोग्यदायी असतात. त्याबाबत वेळोवेळी अनेक प्रकारची माहितीही समोर येत असते. मात्र, शेवग्यामध्ये दुधापेक्षा तब्बल 17 पट अधिक कॅल्शियम असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ऑस्टियोपेनिया आणि मुडदूस यामुळे रुग्णाचे आयुष्य खूप त्रासदायक बनते. हे सर्व आजार टाळण्यासाठी कॅल्शियमचा स्तर शरीरात चांगला असणे आवश्यक असते. दूध हा आहारातील कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा स्रोत मानला जातो; परंतु काही लोक ते सेवन करू शकत नाहीत. काही लोकांना त्याची चव आवडत नाही, तर काहींना अलर्जी होते. जे लोक ‘वेगन’ आहेत तेही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळतात. अशावेळी कॅल्शियमची गरज कशी भागवायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला या खनिजाची गरज असली, तरी हाडांना कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते. जेव्हा आहारातून कॅल्शियम मिळत नाही, तेव्हा शरीर हाडांमधून ते शोषू लागते.

शेवग्याच्या शेंगा कॅल्शियमचा चांगला स्रोत असतात. याला मोरिंगा किंवा ड्रमस्टिकसुद्धा म्हणतात. आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, शेवग्याच्या पानांमध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असते; तर त्याच्या पावडरमध्ये ते 17 पट जास्त असते. हे वृद्धत्वविरोधी मानले जाते, म्हणून 30 नंतर या सुपरफूडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे हाडांचे वस्तुमान वाढू लागते म्हणजेच हाडांची जाडी नीट होते. गर्भवती महिला आणि मुलांनीदेखील शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये लोह असते जे गर्भवती महिला आणि मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे लोहाच्या कमतरतेचा धोका कमी करते आणि अशक्तपणा टाळते. शरीराला चांगले कार्य करण्यासाठी भरपूर रक्ताची आवश्यकता असते, जे यातून मिळते.

Back to top button