मिठाचे रिसॉर्ट! | पुढारी

मिठाचे रिसॉर्ट!

ला पाझ-बोलिव्हिया : जगभरात अनोख्या इमारतींची आणि हॉटेल्सची काहीही कमी नाही. मात्र, दक्षिण अमेरिकेच्या एंडीज पर्वतावर जगभरातील सर्वात अजब असे एक रिसॉर्ट वसलेले आहे, जे केवळ आणि केवळ मिठापासून तयार झाले आहे. हे रिसॉर्ट पृथ्वीच्या सर्वात भव्य मिठागराच्या मैदानावर वसवले गेले आहे. या रिसॉर्टमधील फर्निचर, फ्लोअरिंग, सर्व मूर्ती हे सारे काही मिठापासूनच तयार केले गेले आहे. इतकेच नव्हे तर इथले खाणे देखील केवळ मिठापासूनच तयार केले गेलेले असते.

बोलिव्हियातील सालार डी उईयुनीच्या तटावर स्थित या रिसॉर्टचे ‘पॅलासियो डि साल’ असे नाव आहे. याचा अर्थही मिठाचा महाल असाच होतो. या तटांवर 4 हजार चौरस मैल अंतरात मिठागर आहे. या रिसॉर्टमधील आतील सर्व छायाचित्रे पाहता, त्यातील प्रत्येक वस्तू मिठाची असल्याचे प्रत्यंतर येते.

हे हॉटेल 35 सेंटिमीटर्स मिठाच्या दाण्यांपासून 10 लाख ब्लॉक्स तयार करून वसवले गेले आहे. 10 हजार टन वजनाचे हे रिसॉर्ट केवळ दोन वर्षांच्या कालावधीत तयार केले गेले होते. या रिसॉर्टचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील खोल्यांमधून अमेरिकेतील विशाल वाळवंटाचा नजारा डोळ्यात साठवून ठेवता येतो. इतके कमी की काय म्हणून येथे स्पा उपलब्ध करून देण्यासाठी सॉल्ट वॉटर बाथ दिले जाते. बोलिव्हियातील हे हॉटेल समुद्र सपाटीपासून 12 हजार फूट उंचीवर आहे.

संबंधित बातम्या
Back to top button