लेकीच्या लग्नात वर्‍हाडींना दिले हेल्मेटचे गिफ्ट! | पुढारी

लेकीच्या लग्नात वर्‍हाडींना दिले हेल्मेटचे गिफ्ट!

रायपूर : लग्नात अनावश्यक खर्च करणे, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे, रुसवेफुगवे, हुल्लडबाजी असे प्रकार अनेक ठिकाणी होत असतात. मात्र हल्ली लग्नातील उधळपट्टी वजा करून समाजोपयोगी काम करीत आपल्या आयुष्यातील मोठा दिवस खर्‍या अर्थाने संस्मरणीय करणारीही काही जोडपी पाहायला मिळत आहेत. छत्तीसगडमधील एका वधूपित्यानेही असेच काम केले आहे. त्याने लेकीच्या लग्नात वर्‍हाडींना हेल्मेटचे गिफ्ट देऊन रस्ते अपघातांशी संबंधित जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

सध्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षभरात देशात रस्ते अपघातात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली. त्यामध्ये 1,68,491 लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोकांना दुचाकी चालवत असताना डोक्यावर हेल्मेट घालण्याचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे लेकीच्या लग्नाचे औचित्य साधून या बापमाणसाने अनोखा उपक्रम केला. या लग्न समारंभाचा व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

छत्तीसगडच्या कोर्बा येथील या व्यक्तीने सांगितले की, रस्ते अपघातांबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी माझ्या मुलीचे लग्न हा सर्वोत्तम प्रसंग आहे, असे मला वाटले. मी पाहुण्यांना सांगितले की, जीवन अनमोल आहे. मद्यपान करून वाहने चालवू नका, असेही यावेळी आवाहन केले. बहुतांश रस्ते अपघात हे मद्यपान करून वाहन चालवल्यामुळेच होत असतात. दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालणे किती गरजेचे आहे, हेसुद्धा लोकांना सांगितले व त्यांना हेल्मेटची भेट दिली.

Back to top button