Rose : जगातील सर्वात महागडे गुलाब | पुढारी

Rose : जगातील सर्वात महागडे गुलाब

नवी दिल्ली : गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गुलाब अनेक प्रकारांमध्ये आणि रंगांमध्ये उपलब्ध आहे; पण तुम्हाला जगभरातील सर्वात महाग गुलाब माहितीय का? जगातील सर्वात महाग गुलाबाचं नाव आहे ज्युलिएट रोज. ज्युलिएट रोज त्याच्या सुगंध, सौंदर्य आणि किमतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल, अशी किती किंमत असेल याची? 10 रुपये, 20 रुपये किंवा मग 100 रुपये… तर थांबा… तुम्ही चुकताय, ज्युलिएट रोजची किंमत कोटींमध्ये आहे.  (Rose)

या गुलाबाच्या किमतीमध्ये तुम्ही मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू कार किंवा तीन मोठे बंगले विकत घेऊ शकता. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्यच नाही तर अगदी गडगंज श्रीमंत असणारे लोकही हा गुलाब विकत घेताना शंभरदा विचार करतील. जगातील सर्वात महागड्या गुलाबांमध्ये समाविष्ट होणारं ज्युलिएट रोज एवढं महाग का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. ज्युलिएट रोजची किंमत 130 कोटी रुपये आहे. 2006 मध्ये जगाला पहिल्यांदा ज्युलिएट रोजची ओळख झाली. (Rose)

प्रसिद्ध रोज ब्रीडर डेव्हिड ऑस्टिनने जगासमोर सर्वात आधी ज्युलिएट रोज सादर केलं. रोज ब्रीडरने अनेक गुलाबांच्या प्रजाती संकरित करून ज्युलिएट रोज तयार केलं होतं. त्यावेळी हे गुलाब तब्बल 90 कोटींना विकण्यात आलं होतं. ज्युलिएट रोजची किंमत ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की, या गुलाबात नक्की आहे काय? एवढं महाग का? हे गुलाब उगवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा काळ लागतो आणि 5 मिलियन डॉलर्स (जवळपास 34 कोटी रुपये) लागतात. डेव्हिड ऑस्टिनच्या वेबसाईटनुसार, ज्युलिएट रोजचा सुगंध चहाच्या गंधाप्रमाणे असतो. त्याच्या अनेक पाकळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना त्याला एक आगळेवेगळे सौंदर्य बहाल करते. यामुळेही हा गुलाब खास ठरतो.

Back to top button