32 मेंदू, 100 दात,10 डोळ्यांचा प्राणी | पुढारी

32 मेंदू, 100 दात,10 डोळ्यांचा प्राणी

कॅलिफोर्निया : काही जीव इतके अविश्वसनीय असतात की, त्यांना पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो, हे जीव याच ग्रहावरील आहेत की अन्य ग्रहावरून आले आहेत? जगात असे अनेक प्रकारचे जीव आपल्याला अगदी थक्क करून जातात. याच धर्तीवर, जगात जगात एक असा जीवही आढळतो. ज्याचे एक किंवा दोन नाही तर 32 मेंदू असतात आणि इतके कमी की काय म्हणून 10 डोळे आणि तोंडात 100 दात असतात. मात्र, आता 32 मेंदू असूनही हा जीव मनुष्याला मात देऊ शकत नाही.

तसे पाहता, एकाच जीवाचे 32 मेंदू, 10 डोळे आणि 100 दात असतात हे ऐकून एखादा मोठ्या आकाराचा प्राणी नजरेसमोर तरळून जाईल. मात्र एवढा विचित्र असूनही 32 मेंदूचा हा जीव खूप साधारण आणि आकारात खूप छोटा असतो, हे आणखी धक्कादायक आहे. हा प्राणी जळू म्हणजेच जळवा आहे. याला लीच या नावानेही ओळखले जाते. होय, जळू हा असा प्राणी आहे ज्याचे 32 मेंदू, 10 डोळे आणि तोंडात 100 दात असतात. जगात जळूच्या एकूण 600 पेक्षा जास्त प्रजाती सापडतात. हे जीव ओलावा असणार्‍या क्षेत्रात आढळतात. त्यांचा मेंदू 32 भागांमध्ये विभागलेला असतो. यामुळे त्यांना 32 जीवांचा प्राणी असे म्हटले जाते. जळूच्या 600 पेक्षा अधिक प्रजातींमधून 100 प्रजाती या खार्‍या पाण्याच्या असतात आणि 400 पेक्षा अधिक प्रजाती या गोड पाण्याच्या असतात.

अनेक देशांमध्ये जळूचा वापर रक्त स्वच्छ करण्याच्या थेरेपीच्या रूपात केला जातो. एकदा जळूने तुम्हाला पकडले तर त्यांना सोडवणे कठीण असते. त्यामुळे, त्यांच्यापासून जपून रहावे लागते. पण, आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जळूने चावा घेतल्यास त्याची साधी जाणीवही आपल्याला होत नसते.

Back to top button