तब्बल 87 वर्षांनी मिळाले ‘तिचे’ विमान | पुढारी

तब्बल 87 वर्षांनी मिळाले ‘तिचे’ विमान

वॉशिंग्टन : तब्बल 87 वर्षांपूर्वी एका अमेरिकन महिलेने भलतेच धाडस केले होते. तिने एका छोट्या विमानातून पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प सोडला. या विमानात बसून ती निघालीही, मात्र दुर्दैवाने तिचा हा प्रवास पूर्ण होऊ शकला नाही व हे विमान कोसळले. मात्र, अनेक वर्षे शोध घेऊनही तिचे हे कोसळलेले विमान सापडले नव्हते. आता तब्बल 87 वर्षांनंतर हे विमान सापडले आहे. या महिलेचे नाव होे अमेलिया इअरहार्ट.

अमेरिकन हवाई दलाच्या एका माजी गुप्तचर अधिकार्‍याने अमेलियाचे विमान सापडल्याचा दावा केला आहे. हे विमान सुमारे नऊ दशकांपूर्वी प्रशांत महासागरात बेपत्ता झाले होते. अमेलियाने 1932 मध्ये पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी या छोट्या विमानातून उड्डाण केले होते. या प्रयत्नामध्ये ती यशस्वी झाली असती तर हे काम करणारी ती जगातील पहिली महिला पायलट ठरली असती. मात्र, अचानक तिचे हे विमान महासागरात कोसळले. त्यानंतर पाच-सहा वर्षे तिचा शोध घेण्यात आला, पण काहीच सापडले नाही.

आता अमेरिकन हवाई दलाचे माजी गुप्तचर अधिकारी टोनी रोमियो यांनी प्रशांत महासागराच्या खोल भागात अमेलियाच्या या विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे. टोनीची कंपनी ‘डीप सी व्हिजन’ने सागरी ड्रोनच्या मदतीने हे विमान शोधले. हे विमान हॉलँड बेटापासून 160 किलोमीटरवर समुद्रात 16,400 फूट खोलीवर सापडले. हे ठिकाण हवाई बेटं आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या भागात आहे. खोल समुद्रातील ड्रोनने घेतलेली सोनार छायाचित्रे थोडी धुसर आहेत, पण त्यामध्ये दिसणारा विमानाचा आकार अमेलियाच्या विमानाशी जुळणारा आहे.

Back to top button