पृथ्वीजवळून गेला फुटबॉल मैदानाइतका लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून गेला फुटबॉल मैदानाइतका लघुग्रह

वॉशिंग्टन : ‘नासा’ने म्हटले आहे की, एखाद्या फुटबॉल मैदानाइतक्या आकाराचा लघुग्रह शुक्रवारी पृथ्वीजवळून पुढे गेला. आता अनेक शतकांनंतर तो पृथ्वीच्या भेटीला येईल. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटीच्या माहितीनुसार या लघुग्रहाचे नाव ‘2008 ओएस 7’ असे आहे. हा लघुग्रह सुमारे 890 फूट रुंदीचा आहे. 2 फेब्रुवारीला हा लघुग्रह पृथ्वीपासून 2.85 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून गेला. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतराच्या सातपट अधिक आहे.

हा लघुग्रह पृथ्वीजवळून जात असताना त्याचा वेग ताशी 66 हजार किलोमीटर इतका होता. हा लघुग्रह बेन्नू नावाच्या लघुग्रहाच्या निम्म्या आकाराचा आहे. ‘बेन्नू’ या लघुग्रहावर यान उतरवून ‘नासा’ने तेथील नमुने गोळा केलेले आहेत. सध्या या नमुन्यांचे विश्लेषण केले जात आहे. अंतराळात असे अनेक लघुग्रह फिरत आहेत. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान अशा लघुग्रहांचा एक पट्टाच असून, त्याला ‘अस्टेरॉईड बेल्ट’ या नावानेच ओळखले जाते. नेपच्यूनच्या पुढेही सौरमंडळाच्या सीमेजवळ असे अनेक लघुग्रह आहेत.

‘नासा’ने सुमारे 25 हजार लघुग्रहांचा शोध लावला आहे जे संभाव्य रुपाने पृथ्वीला धोकादायक ठरू शकतात. दर वीस हजार वर्षांनी अशी एखादी मोठी अवकाशीय शिळा पृथ्वीला धडकण्याचा धोका असतो. पृथ्वीवरून डायनासोरसह अनेक प्रजातींना नष्ट करणारा एक लघुग्रह सध्याच्या मेक्सिकोच्या चिक्सलब या भागात पृथ्वीला धडकला होता. अशा एखाद्या धोकादायक लघुग्रहाची दिशा बदलता यावी यासाठी ‘नासा’ने ‘डार्ट’ मोहीम आखली होती व ती यशस्वीही झाली.

Back to top button