प्राचीन काळात होता करवतीसारख्या जबड्याचा मासा | पुढारी

प्राचीन काळात होता करवतीसारख्या जबड्याचा मासा

वॉशिंग्टन : सध्याच्या ग्रेट व्हाईट शार्कची दहशत मोठीच आहे. त्याचा जबडा म्हणजे साक्षात काळाचाच जबडा मानले जात असते. मात्र, प्रागैतिहासिक काळातही अनेक घातक हल्लेखोर मासे होते. त्यामध्येच सध्याच्या शार्कचे विशालकाय पूर्वज असलेल्या मेगालोडनचाही समावेश होतो. मात्र, एखाद्या करवतीसारखाच जबडा असणारा मासाही प्राचीन काळात अस्तित्वात होता. त्याचे नाव आहे ‘एलियनाकँथस’. एखाद्या एलियन म्हणजेच परग्रहावरील जीवाची उपमा या माशाला दिली जाते.

या माशाचे पहिले ज्ञात जीवाश्म पोलंडमध्ये 1957 मध्ये सापडले होते. ज्या संशोधकाला हे जीवाश्म सापडले त्याला वाटले होते की, या माशामध्ये फिन जोडलेला लांब मणका होता; मात्र आता स्पष्ट झाले आहे की, ज्याला हा काटेरी ‘मणका’ समजले गेले होते तो या माशाचा खालचा जबडा होता! या जबड्यात अत्यंत तीक्ष्ण असे अणुकुचीदार दात होते.

त्यामुळे या माशाला सर्वात प्राचीन आणि सर्वात घातक हल्लेखोर मानले जात आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिच युनिव्हर्सिटीतील पॅलिओंटोलॉजिस्ट मेलिना जॉबिन्स यांनी याबाबतची माहिती दिली. हा मासा 419 दशलक्ष ते 358.9 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या डेवोनियन काळात अस्तित्वात होता. त्यावेळी पृथ्वीवरील भूमी दोन महाखंडांमध्ये विभाजित झाली होती.

Back to top button