लंडन : एका स्टार्टअपने प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रिक विमानाचे डिझाईन तयार केले आहे. या विमानातून 90 प्रवासी हवाई प्रवास करू शकतील. हे विमान येत्या दहा वर्षांमध्येच म्हणजे 2033 पर्यंत लाँच होऊ शकेल.
डच कंपनी 'इलिसियान' ने हे बॅटरीवर चालणारे 'इ 9 एक्स' कन्सेप्ट विमानाचे डिझाईन बनवले आहे. एकदा चार्ज झाले की, हे विमान 800 किलोमीटरचे अंतर कापू शकते. त्याचा बॅटरी पॅक 360 वॅट-अवर्स पर किलोग्रॅम आहे. टेस्लाच्या बॅटरीची घनता 272 ते 296 वॅट-अवर्स पर किलोग्रॅम आहे. भविष्यात हे विमान 1 हजार किलोमीटरपर्यंतचा पल्लाही गाठू शकते. 'इ 9 एक्स'चे डिझाईन तसेच त्यामधील मुलभूत तंत्रज्ञानाचा विकास डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे.
याबाबतच्या संशोधनाची माहिती 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड अस्ट्रोनॉटिक्स जर्नल'मध्ये देण्यात आली आहे. यापूर्वी असे मानले जात होते की, केवळ 19 प्रवाशांसाठीचे इलेक्ट्रिक विमान बनवले जाऊ शकते. असे विमान 400 किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकेल.