चंद्रावर निष्क्रिय पडलेले जपानचे यान झाले सक्रिय | पुढारी

चंद्रावर निष्क्रिय पडलेले जपानचे यान झाले सक्रिय

टोकियो : जपानची अंतराळ संशोधन संस्था ‘जाक्सा’ने सोमवारी म्हटले की, चांद्रभूमीवर लँड केल्यानंतर गेल्या एक आठवड्यापेक्षाही अधिक काळ निष्क्रिय पडलेले ‘स्लिम’ यान आता काम करू लागले आहे. या यानाने विद्युतऊर्जा मिळवली आहे. यानाचे सौरपॅनेल चुकीच्या दिशेने वळल्यामुळे त्याला वीज मिळणे बंद झाले होते.

‘जाक्सा’च्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी रात्री उशिरा संशोधकांचा ‘स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून’शी संपर्क साधू शकला. 20 जानेवारीला चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर नऊ दिवसांनी यानाशी संपर्क साधण्यात ‘जाक्सा’ला यश आले. या यानाच्या यशस्वी लँडिंगमुळे जपान हा चांद्रभूमीवर उतरणारा पाचवा देश ठरला होता. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने ही कामगिरी करून दाखवली होती. मात्र, लँडिंग होताच सोलर पॅनेलमधील गडबडीमुळे हे यान निष्क्रिय पडले होते.

आता ‘जाक्सा’ने म्हटले आहे की, सूर्याच्या दिशेतील बदलामुळे त्याचा प्रकाश या लँडरच्या सोलर पॅनेलवर पडला आणि त्याने वीजनिर्मिती केली. त्यामुळे नऊ दिवस चंद्रावर जणू काही मृतावस्थेत पडलेले हे यान ‘जिवंत’ झाले! त्यानंतर यानाने चांद्रभूमीवरील ओलिविन खडकांची संरचना जाणून घेण्यासाठी आपल्या मल्टिबँड स्पेक्ट्रल कॅमेर्‍याने छायाचित्रे टिपणेही सुरू केले आहे. 20 जानेवारीला हे मून लँडरने निर्धारित लँडिंग स्थळापासून 55 मीटर दूर, चंद्राच्या भूमध्य रेषेजवळील एका खड्ड्यात लँडिंग केले होते.

Back to top button