उडदाची डाळ आरोग्यासाठी बहुपयोगी | पुढारी

उडदाची डाळ आरोग्यासाठी बहुपयोगी

नवी दिल्ली : उडदाच्या डाळीचा वापर डोशासारख्या अनेक पदार्थांमध्ये केला जात असतो. उडदाची भजीही अनेकांना आवडतात. मात्र, ही डाळ चिकट होते, म्हणून काही लोक नाकही मुरडतात. मात्र, या डाळीचे पोषणासाठी बरेच महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक पोषक घटक या डाळीमधून मिळत असतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

उडदाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात डाएटरी फायबर असते. तसेच आयर्न, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी हेसुद्धा असते. उडीद डाळ हाडांसाठी लाभदायक असते. या डाळीत पोटॅशियम, कॅल्शियम व फॉस्फरससारखे हाडांसाठी गुणकारी पोषक घटक असतात. त्यामुळे ही डाळ खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका कमी होतो.

उडीद डाळीत पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील तणाव कमी होतो. परिणामी, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. उडीद डाळीत मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस्ही असतात. त्यामुळे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मदत मिळते. स्नायू आणि सांध्यांमधील वेदना कमी होण्यास उडीद डाळ सहायक ठरते. या डाळीत फायबर अधिक असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. तसेच पचनसंस्थाही चांगली राहते.

Back to top button