अंतराळातील सॅलड ठरते सर्वाधिक धोकादायक! | पुढारी

अंतराळातील सॅलड ठरते सर्वाधिक धोकादायक!

न्यूयॉर्क : एका नव्या संशोधनात अंतराळात कृत्रिम पद्धतीने उगवले जाणार्‍या सॅलडमुळे अंतराळवीरांना अन्नबाधा होण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि यामुळे अंतराळातील हे सॅलड सर्वाधिक धोकादायक असतात. अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणामुळे हा धोका असतो, असा या संशोधकांचा दावा आहे.

अंतराळात स्थापित अंतराळ स्थानकावर विविध प्रकारांचे प्रयोग सातत्याने राबवले जात असतात. भारहिनतेच्या वातावरणाची गरज असते, असे प्रयोग तेथे हमखास केले जातात. याच मालिकेत संशोधकांनी अंतराळात गुरुत्वाकर्षण नसताना सॅलडची निर्मिती करता येऊ शकते का, याचा अभ्यास केला. यात त्यांना यश तर आलेच. शिवाय, आयएसएसमध्ये निर्मिलेल्या या सॅलडचा नासा अंतराळवीरांच्या आहारातदेखील समावेश करण्यात आला. मात्र, या सॅलडचे तोटेच अधिक असतात, असे त्यांना आढळून आले.

डेलावेयर विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. अंतराळात उगवणार्‍या सॅलडमध्ये विषाणूंचे संक्रमण लवकर का होते, यावर या संशोधकांनी लक्ष केंद्रित केले. याविषयी शोधनिबंध सायंटिफीक रिपोर्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आयएसएस मध्ये मागील तीन वर्षांपासून अंतराळात घेतल्या जाणार्‍या लेट्यसचे तेथील अंतराळवीरांच्या आहारात समावेश केला जात आहे. हे सॅलड अतिशय खास स्वरूपाच्या चेंबर्समध्ये उगवले जाते. शिवाय, त्याची निर्मितीची प्रक्रियाही अनोखी असते. या सॅलड निर्मितीसाठी वेगळ्या प्रकारचे वातावरण उपलब्ध करून द्यावे लागते. पण, त्यात किंचीतही कसूर राहिल्यास या सॅलडची चटकन विषबाधा होऊ शकते. कारण असे की, अंतराळात पानांनी श्वास घेण्याची जागा, ज्याला स्टोमॅटो असे म्हटले जाते, ती नेहमी खुली असते आणि यामुळे संक्रमित कीटक सहजपणे घुसखोरी करू शकतात. त्याच तुलनेत पृथ्वीवरील स्टोमॅटो रात्रीच्या वेळी बंद होते आणि यामुळे अन्न बाधत नाही.

Back to top button