सर्वात विषारी पक्षी! | पुढारी

सर्वात विषारी पक्षी!

मेक्सिको : विषारी साप, विषारी विंचू याबद्दल आपण यापूर्वी खूप काही ऐकले-वाचले आहे. मात्र, काही पक्षीही प्रमाणापेक्षा जहाल व विषारी असू शकतात, असे म्हटले तर प्रथमदर्शनी त्याच्यावर विश्वासही ठेवता येणार नाही. मात्र, जागतिक स्तरावर हुडेड पिटोहुई हा पक्षी जगभरातील सर्वात विषारी पक्षी म्हणून ओळखला जातो आणि तो किती विषारी ठरू शकतो, याचे काही भयंकर दाखलेही मिळत आले आहेत.

हुडेड पिटोटुई नावाच्या या पक्ष्याला स्पर्श केले तर तो स्पर्शही आपल्याला यमसदनी धाडणारा ठरू शकतो, असे संकेत आहेत. या पक्ष्याला चुकून स्पर्श जरी झाला तरी पूर्ण शरीर जळाल्यासारखे भासते आणि पॅरालिसिससारखे काहीही संकट येऊ शकते. अगदी या पक्ष्याचा स्पर्श मृत्यूचे कारणही ठरू शकेल, अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ए टू झेड अ‍ॅनिमल्स या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या रिपोर्टनुसार, न्यू गिनीमध्ये आढळून येणार्‍या या पक्ष्याचे शास्त्रीय नाव पिटोहुई डायक्रोस असे आहे. न्यू गिनी हे इंडोनेशियाच्या पूर्वेस स्थित बेट आहे. या पक्ष्याच्या 6 प्रजाती ज्ञात आहेत आणि त्यातील हुडेड पिटोहुई ही प्रजाती सर्वाधिक धोकादायक मानली जाते. या पक्ष्याचे पोट लाल रंगाचे तर डोके, पंख व शेपूट काळ्या रंगाचे असते. त्याचे पाय मजबूत असतात आणि चोचही ताकदवान असते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने या पक्ष्याला सर्वात विषारी पक्षी म्हणून घोषित केले आहे.

या विषारी पक्ष्याच्या त्वचा, पंख व अन्य अंगात बॅट्रॉकोटॉक्सिन नावाचे न्युरोटॉक्सिन आढळून येते आणि याचमुळे हा पक्षी सर्वात विषारी म्हणून ओळखला गेला आहे. या पक्ष्याने चोच मारली तरी ते त्रासदायक ठरू शकते. शिवाय, त्याचा स्पर्शही जीवघेणा ठरू शकतो.

Back to top button