लाळेच्या सहाय्याने रक्‍तातील साखर तपासणारी स्ट्रीप | पुढारी

लाळेच्या सहाय्याने रक्‍तातील साखर तपासणारी स्ट्रीप

सिडनी : लवकरच रक्‍तातील शर्करा म्हणजेच साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी सुईची वेदना सहन करण्यापासून सुटका होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक अशी स्ट्रीप बनवली आहे जी माणसाची लाळ तपासून रक्‍तातील साखरेचे प्रमाण अधिक आहे की कमी हे सांगू शकेल. सध्या बोटाच्या टोकाला सुई टोचून रक्‍ताचे थेंब बाहेर काढले जातात व ग्लुकोज मॉनिटरच्या सहाय्याने तपासणी होते. नवी स्ट्रीप उपलब्ध झाल्यावर ही वेदना सहन करावी लागणार नाही.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने 35 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामधून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट तयार केले जातील. क्‍लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यावर किट तयार करण्याची प्रक्रिया याच वर्षी सुरू होईल.

2023 पर्यंत असे किट तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर हे किट विक्रीसाठी उपलब्ध होईल. ब्लड शुगर तपासण्यासाठी ही स्ट्रीप जीभेवर ठेवली जाते. लाळेच्या संपर्कात येताच स्ट्रीपवर प्रक्रिया (रिअ‍ॅक्शन) सुरू होते. ही स्ट्रीप स्मार्टफोनच्या एका अ‍ॅपशी कनेक्ट असते. रिअ‍ॅक्शन झाल्यानंतर अ‍ॅपवरून समजते की ब्लड शुगर किती आहे. खास लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून ही स्ट्रीप विकसित केल्याचे संशोधक पॉल दस्तूर यांनी सांगितले.

एखाद्या च्युईंगमच्या आकाराच्या या स्ट्रीपमध्ये बायोसेन्सर आहेत. त्यामुळे रासायनिक क्रिया झाल्यावर सिग्‍नल जनरेट होतात. स्ट्रीपमध्ये एक ट्रान्सिस्टर आहे ज्यामध्ये ग्लुकोज ऑक्सिडेज एन्झाईम असते. ते लाळेतील शर्करेशी प्रक्रिया करते आणि हायड्रोजन परऑक्साईड तयार करते. ते पुढे सिग्‍नल पाठवते आणि अ‍ॅपवर निष्कर्ष दिसतो!

Back to top button