सात वर्षांपासून ‘मेडिटेरियन डाएट’ अव्वल! | पुढारी

सात वर्षांपासून ‘मेडिटेरियन डाएट’ अव्वल!

न्यूयॉर्क : हेल्दी डाएट म्हणजेच आरोग्यदायी आहाराचा विषय निघाला की ‘मेडिटेरियन डाएट’ सर्वात वरच्या स्थानावर येत असते. गेल्या सात वर्षांपासून ‘मेडिटेरियन डाएट’ अव्वल स्थानावर आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टने पुन्हा एकदा या आहाराच्या महत्त्वाला अधोरेखित केले आहे.

यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या वार्षिक ‘बेस्ट डाएटस् रँकिंग’मध्ये मेडिटेरियन डाएटने सलग सातव्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या आहारामध्ये असे काय आहे जे त्याचे असे महत्त्व वाढवते हे जाणून घेणे अनेकांना आवडेल. या आहाराला केवळ ‘डाएट’ म्हणणे चुकीचे ठरेल. याचे कारण म्हणजे भूमध्यसागरीय लोकांची ही जीवनशैलीच आहे. तीच त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यी बनवत असते. यामध्ये हेल्दी फॅटस्, तेल आणि वनस्पतींवर आधारित भोजनाला प्राधान्य दिले जाते. या आहारात फळे, भाज्या, अखंड धान्य, शेंगा, मासे, ऑलिव्ह ऑईलचा समावेश होतो.

प्रोसेस्ड फूड, रेड मीट आणि साखरेचे सेवन तिथे अतिशय कमी प्रमाणात केले जाते. केवळ आहारावरच हे लोक भर देत नाहीत तर सक्रिय राहणे, तणाव कमी करणे आणि सामाजिक संबंध मजबूत करणे हा सुद्धा या जीवनशैलीचा एक भाग आहे. मेडिटेरियन डाएटमध्ये गरजेची सर्व पोषक घटक मिळतात. ऑलिव्ह ऑईल आणि मत्स्याहारामधून मिळणारे ‘ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’ हे हृदयाच्या व मेंदूच्या आरोग्यासाठी पोषक ठरते. फळे, भाज्या आणि अखंड धान्यामधून मिळणार्‍या फायबरमुळे पचनसंस्था चांगली राहते. तसेच अनेक आजारांना दूर ठेवले जाते. फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस् पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते. हा आहार हाडांपासून ते मेंदूपर्यंत शरीराच्या सर्व अवयवांचे पोषण करणारा आहे.

Back to top button