स्मार्टफोन चक्‍क घामाने चार्ज होणार! | पुढारी

स्मार्टफोन चक्‍क घामाने चार्ज होणार!

वॉशिंग्टन : स्मार्टफोन हा आता बहुसंख्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हे बहुपयोगी उपकरण वापरत असताना सर्वाधिक चिंता असते ती बॅटरी डाऊन होण्याची! त्यावर वेगवेगळे उपाय शोधले जात असतात.

आता लवकरच चक्‍क घामाच्या सहाय्यानेही स्मार्टफोन चार्ज करता येऊ शकेल. अमेरिकन संशोधकांनी यासाठीचे एक प्रोटोटाईप तयार केले आहे.

या उपकरणाला हाताच्या बोटांवर परिधान केले जाते. रात्री झोपलेले असताना किंवा बसलेले असताना येणार्‍या घामापासून वीज तयार होईल आणि तिच्या सहाय्याने स्मार्टफोन चार्ज होईल. या उपकरणाला सॅनदियागोच्या कॅलिफार्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी विकसित केले आहे. या डिव्हाईसमध्ये (उपकरण) इलेक्ट्रिकल कंडक्टर लावलेले आहेत. तसेच कार्बन फोमचा वापर करण्यात आला आहे. तो बोटांमधून निघणारा घाम शोषून घेतो. इलेक्ट्रोडमध्ये असलेले एन्झाईम घामाच्या कणांमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू करते.

त्यापासून विद्युतनिर्मिती होते. इलेक्ट्रोडच्या खाली छोटी चिप लावलेली आहे. ती दाबल्यावर डिव्हाईस वीजनिर्मिती करू लागते. संशोधक लू यिन यांनी याबाबतची माहिती दिली. या डिव्हाईसचा आकार एक चौरस सेंटीमीटर आहे. डिव्हाईसमधील मटेरियल लवचिक आहे.

त्यामुळे ते बोटांवर परिधान केल्यावर ते गैरसोयीचे वाटत नाही. ते कितीही वेळ परिधान केले जाऊ शकते. हे उपकरण सावकाशपणे वीजनिर्मिती करते. एखाद्या स्मार्टफोन ला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी तीन तास हे डिव्हाईस परिधान करावे लागते. भविष्यात चार्ज करण्याची क्षमता वाढवली जाईल.

Back to top button