50 फुटांचे मेगालोडन दिसत नव्हते ग्रेट व्हाईट शार्कसारखे? | पुढारी

50 फुटांचे मेगालोडन दिसत नव्हते ग्रेट व्हाईट शार्कसारखे?

वॉशिंग्टन : प्राचीन काळी ‘मेगालोडन’ या नावाचे महाकाय शार्क मासे महासागरांमध्ये वावरत होते. सध्याच्या ग्रेट व्हाईट शार्कची लांबी 50 फुटांची झाली तर तो जसा दिसेल तसेच एकंदरीत त्यांचे स्वरूप होते असे मानले जाते. मात्र, आता एका नव्या वादग्रस्त संशोधनात म्हटले आहे की हे मेगालोडन मासे ग्रेट व्हाईट शार्कसारखे दिसत नव्हते! ते लांबट आणि सडपातळ शरीराचे होते असे या नव्या संशोधनात म्हटले आहे.

मेगालोडन या प्राचीन मत्स्यप्रजातीला ‘ओटोडस मेगालोडन’ असे नाव आहे. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधील रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसमधील संशोधकांनी या लुप्त झालेल्या माशांच्या जीवाश्माचे नव्याने अध्ययन केले आहे. त्यांनी मेगालोडनच्या जीवाश्मातील एका अर्धवट मणक्याचा यासाठी अभ्यास केला. त्यावेळी त्यांना अशा मणक्यावरून यापूर्वी मेगालोडनची जी प्रतिमा तयार केली होती, त्याच्याशी विसंगत असे त्याचे रूप असल्याचे आढळून आले.

पूर्वी म्हटले होते की या माशाची लांबी 52 फूट म्हणजेच 16 मीटर होती. तसेच त्यांचा देह सध्याच्या ग्रेट व्हाईट शार्कसारखा होता. आता संशोधकांनी म्हटले आहे की ही धारणा चुकीची होती असे दिसून आले आहे. मेगालोडनचा सांगाडा आणि शरीराचा आकार याबाबतचे चुकीचे अंदाज बांधले गेले होते. 26 शार्क तज्ज्ञांच्या टीमने हे नवे संशोधन केले असून त्याची माहिती ‘पॅलिओंटोलॉजिया इलेक्ट्रोनिका’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. सध्याच्या ग्रेट व्हाईट शार्कचा मणका तसेच सांगाडा हा मेगालोडनच्या मणका व सांगाड्यापेक्षा वेगळा असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

Back to top button