आर्टिफिशियल इंटेलिजेन्स करणार हस्ताक्षराचीही कॉपी! | पुढारी

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स करणार हस्ताक्षराचीही कॉपी!

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा जगभरात झपाट्याने विस्तार होत चालला आहे. दिवसागणिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीने मनुष्याला अक्षरश: थक्क करायला लावले आहे. आतापर्यंतची झेप पाहता एआयच्या माध्यमातून आवाजाचा क्लोन तयार केला जाऊ शकत होता. त्याचप्रमाणे समोरासमोर बसून त्याच व्यक्तीच्या समोर बोलूही शकत होता. पण, आता त्याहीपेक्षा झेपावत एआयच्या माध्यमातून आता मनुष्याचे हस्ताक्षर देखील कॉपी केले जाऊ शकेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

अबुधाबीतील एक आघाडीच्या विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून आता मनुष्याचे हस्ताक्षर थेट कॉपी करता येऊ शकते, असे या संशोधकांचे मत आहे. हे हस्ताक्षर इतके हुबेहूब असेल की, त्यातून खरे हस्ताक्षर आणि एआयचे हस्ताक्षर यातील फरक शोधून काढणेदेखील अवघड असेल, असा या संशोधकांचा दावा आहे. अर्थात, याचवेळी काही फसवणुकीचे प्रकारदेखील घडण्याची शक्यता येथे टाळता येणार नाही, असे प्रथमदर्शनी चित्र आहे. याचे कारण असे की, कोणत्याही व्यक्तीचे कितीही अवघड हस्ताक्षर असले तरी सहजासहजी कॉपी करता येणे शक्य झाल्यास अशा हस्ताक्षराचा गैरवापर केला जाण्याची शक्यताही तितकीच वाढते.

तूर्तास, याबाबतचे संशोधन प्राथमिक स्तरावर असले आणि त्यावर विस्तृत अभ्यास सुरू असला तरी यातील फायदे-तोटे लक्षात घेऊनच त्याचा अवलंब केला जाईल, याची ग्वाही या संशोधकांच्या पथकाने दिली आहे.

Back to top button