सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ! | पुढारी

सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ!

बीजिंग : भारतातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतू काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. आता एका अशा पुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहूनच धडकी भरेल. जगात अशी काही निवडक ठिकाणे आहेत, जिथे जाण्याचे धाडस प्रत्येकजण सहसा करत नाही. अशाच ठिकाणांपैकी एक पूल चीनमधील बीजिंग येथे आहे. या धोकादायक पुलाचे नाव आहे रूई ब्रीज. हा पूल चीनच्या झेनजियांग प्रांतातील शेंगजियानजू व्हॅलीवर बांधला गेला आहे. या पुलाचा एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून, तो किती धोकादायक आहे याचा या व्हिडीओत सहज दाखला मिळून जातो.

चीनमधील हा पूल दोन पर्वतांमध्ये बांधला आहे. या पुलाची उंची 460 फूट आहे, तर लांबी 328 फूट म्हणजे 100 मीटर आहे. वास्तविक, हा पूल दुहेरी काचेचा पूल आहे. पुलाच्या खाली खोल दरी आहे आणि यामुळे खाली पडले तर मृत्यू निश्चित. याच कारणामुळे या पुलावर जाण्यापूर्वी दोनवेळा विचार करावा लागतो.

अवघ्या 12 सेकंदांचा या पुलाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओ पाहून एका युझरने ‘हा पूल आधुनिक अभियांत्रिकीचं उत्तम उदाहरण आहे’ असे म्हटले, तर एका युझरने ‘कोणत्याही किमतीवर मी या पुलावर जाणार नाही’, अशी मिश्किल टिपणी केली. काही युझर्सनी तर ‘या पुलावरून खाली फक्त पाहिले तरी मरण आठवेल’, असे म्हणत हा पूल प्रत्यक्षात किती धोकादायक असेल, याचेच जणू वर्णन केले!

Back to top button