यूएईच्या शाही परिवाराची डोळे दिपवणारी संपत्ती | पुढारी

यूएईच्या शाही परिवाराची डोळे दिपवणारी संपत्ती

दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या अल नाहयान शाही परिवाराकडे असलेली संपत्ती लोकांचे डोळे दिपवणारीच आहे. या परिवाराच्याच 4078 कोटी रुपयांच्या महालास आज तेथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हा महाल तीन पेंटॅगॉनच्या आकाराइतका आहे. त्याचबरोबर आठ खासगी जेट आणि एक लोकप्रिय फुटबॉल क्लब आहे. हा जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो. राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे या शाही कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांना अठरा भाऊ आणि अकरा बहिणी आहेत. अमिराती शाहींची नऊ मुलं आणि अठरा नातवंडे आहेत.

ब्लूमबर्गने या शाही कुटुंबाला जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब ठरवलेले आहे. हे कुटुंब अबुधाबीमध्ये कसर अल-वतन या राष्ट्राध्यक्ष भवनात राहते. संयुक्त अरब अमिरातीमधील महालांपैकी हा सर्वात मोठा महाल आहे. तो 94 एकर जागेत फैलावलेला आहे. या महालात 3,50,000 स्फटिकांनी सजवलेले एक मोठे झुंबर आहे. तसेच अन्यही अनेक मौल्यवान वस्तू या महालात आहेत.

या महालात सातशेपेक्षाही अधिक महागड्या गाड्यांचा ताफा आहे. त्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘एसयूव्ही’सह पाच बुगाटी वेरॉन, एक लॅम्बॉर्गिनी रेवेंटन, एक मर्सिडिझ बेंझ सीएलके जीटीआर, एक फेरारी 599एक्स एक्स आणि एक मॅकलेरन एमसी12 समाविष्ट आहे. या शाही कुटुंबाकडे जगातील सुमारे सहा टक्के तेल भांडार, मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स आहेत.

Back to top button