अंत्यसंस्कार झालेला तरुण परतला घरी! | पुढारी

अंत्यसंस्कार झालेला तरुण परतला घरी!

वॉशिंग्टन : मृत समजली गेलेली व्यक्ती अचानक उठून बसते आणि लोक चकित होतात असे प्रकार देश-विदेशात अनेकवेळा घडलेले आहेत. कधी-कधी एखाद्या व्यक्तीचा मृतदेह समजून त्यावर अंत्यसंस्कार केले जातात आणि खरी व्यक्ती घरी परत येते. असाच प्रकार अमेरिकेत घडला आहे. ज्याला मृत मानून अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कागदोपत्रीही त्याची मृत म्हणून नोंद करण्यात आली ती व्यक्ती अचानक ‘जिवंत’ होऊन समोर आली! त्याला पाहून प्रत्येकाला धक्काच बसला. कारण, त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याची राखही कुटुंबापर्यंत पोहोचली होती. ज्या व्यक्तीला मृत मानले जात होते, तो फक्त 23 वर्षांचा होता.

ज्या व्यक्तीबाबत हा सारा गोंधळ झाला आहे, त्या व्यक्तीचे नाव टायलर चेस असून, तो केवळ 23 वर्षांचा आहे. त्याचे मृत्यू प्रमाणपत्रही तयार करण्यात आले होते आणि अंत्यसंस्कारानंतर अस्थिकलशही घरी पाठवण्यात आला होता. त्याच्या मृत्यूचे कारण अमली पदार्थांचे ओव्हर डोस असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर अचानक एक दिवशी टेलर हा रेशन घेताना दिसून आला. त्यामुळे तिथे उपस्थित कर्मचारी त्याला पाहून हैराण झाले. त्यांनी त्याच्या ओळखपत्राची मागणी केली.

टेलरने आयडी दाखवल्यावर त्यांचा एकच गोंधळ उडाला. त्यांनी टेलरला सांगितले की, कागदपत्रांनुसार तू मृत आहेस आणि तुझे मृत्यू प्रमाणपत्रही तुझ्या घरी गेले आहे. वास्तवात वेगळाच प्रकार झाला होता. एक दिवस टेलरची पर्स चोरीला गेली आणि ज्याने ती पर्स चोरली त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्याजवळ टेलरची पर्स आढळून आली, त्यामुळे त्याची ओळख टेलर चेस अशी झाली. टेलर अमली पदार्थांच्या सेवनामुळे रिकव्हरी केंद्रात असल्याने आणि त्याच्या कुटुंबाशी त्याचा कुठलाही संपर्क नसल्याने हा सारा गोंधळ झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकार्‍यांनी या गोंधळाबद्दल माफी मागितली.

संबंधित बातम्या
Back to top button