सतत एकाच जागी बसून राहिल्याचे धोके | पुढारी

सतत एकाच जागी बसून राहिल्याचे धोके

नवी दिल्ली : शारीरिक सक्रियता असणे हे अतिशय महत्त्वाचे असते. सतत एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याकडे तर ‘चरैवेती चरैवेती’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ ‘चालत राहा, चालत राहा’; मात्र सध्या अनेकजण बैठ्या कामातच अडकलेले असतात. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो.

कर्मचार्‍यांना एकाच जागी तासन् तास बसून काम पूर्ण करावे लागते. काम तर पूर्ण होतेच, पण त्याचे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. एका अभ्यासानुसार असे दिसून आले की, एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

दिवसभर एकाच जागेवर बसून काम केल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जास्त वेळ बसून राहिल्याने इन्सुलिन हार्मोन्सची रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त राहून लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. दिवसभर बसून राहून कोणतीही हालचाल न केल्याने संध्याकाळच्या वेळी हाडांवर वाईट परिणाम होतात. जास्त काळ स्थिर राहिल्याने, हाडांची घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. तसेच हाडांची वाढ थांबल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो.

संबंधित बातम्या

जास्त वेळ बसल्याने कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. जर एखादी व्यक्ती बर्‍याच काळासाठी बसून राहते; परंतु दिवसभरात व्यायाम, नृत्य, खेळ इत्यादी कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया न केल्यास, हृदयविकार, कर्करोग आणि इतर आजार होण्याचा धोका जास्त असतो. सतत तणावामुळे शरीराला सक्रियता मिळत नाही. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तसेच हृदयविकाराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. सतत एकाच जागेवर बसल्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो. यामुळे टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. ऑफिसमध्ये जास्त वेळ एका जागी बसून काम केल्याने मानदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

Back to top button