कर्करोगावरील उपचारात ‘टी-सेल्स’च्या मार्गातील अडथळे दूर | पुढारी

कर्करोगावरील उपचारात ‘टी-सेल्स’च्या मार्गातील अडथळे दूर

मॅसाच्युसेटस् : कर्करोगावरील उपचार हे अद्यापही विज्ञानासाठी आव्हान बनून राहिलेले आहेत. असे मानले जाते की जर योग्य स्थिती असेल तर शरीरातील ‘टी-सेल्स’ या रोगप्रतिकारक पेशी कर्करोगाच्या पेशींना ओळखून त्यांना नष्ट करतात. मात्र, असेही दिसून आले आहे की कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमध्ये अशा टी-सेल्स ट्युमरच्या प्रभावाखाली असताना आपले काम करण्यास सक्षम राहत नाहीत.

आता नव्या संशोधनात वैज्ञानिकांनी अशा ‘डेंडिटिक सेल्स’च्या विशिष्ट समूहाचा शोध लावला आहे जो विशिष्ट पद्धतीने टी-सेल्सना सक्रिय करतो. या डेंडिटिक सेल्स रुग्णाच्या ट्यूमर प्रोटिनमध्ये स्वतःला लपवून ठेवतात आणि छद्म कॅन्सर सेल्स बनून टी-सेल्सच्या सक्रियतेला उत्तेजन देतात.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘इम्युनिटी जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी सुस्त पडणार्‍या टी-सेल्सना पुन्हा सक्रिय करण्यासाठी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यासाठी सहयोगी रोगप्रतिकारक पेशी असलेल्या ‘डेंडिटिक सेल्स’चा वापर केला जातो.

त्यांच्या वापराने परोक्षरीत्या (अप्रत्यक्षरीत्या) टी-सेल्सना कार्यप्रवण केले जाते. उंदरांवर करण्यात आलेल्या एका प्रयोगात दिसून आले की अशा डेंडिटिक सेल्स ट्यूमरविरोधात काम करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा डेंडिटिक सेल्स अनेक प्रकारच्या असतात व त्यापैकी कोणत्या पेशींची टी-सेल्सला सक्रिय करण्यासाठी कोणती भूमिका असते याबाबत ठोस माहिती उपलब्ध नव्हती.

त्यामुळे संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करून शोधले की ‘डीसी सेल्स’ या सर्वात उपयुक्त डेंडिटिक सेल्स असतात. त्याच अँटिट्यूमर इम्युनिटीसाठी गरजेच्या असून टी-सेल्सना उत्तेजन देऊन त्या कर्करोगावरील पेशी नष्ट करण्यासाठी योगदान देतात.

Back to top button