पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिसल्या ‘या’ प्रजातीच्या गायी | पुढारी

पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिसल्या ‘या’ प्रजातीच्या गायी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून त्यांचे कमी उंचीच्या गायींबरोबरचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या कमी उंचीच्या गोंडस गायी पाहून या नेमक्या कोणत्या प्रजातीच्या आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला. या गायी कोणत्या आहेत? त्यांची किंमत किती आहे? त्यांच्या दुधाला इतके महत्त्व का आहे हे जाणून घेऊया…

मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी काही गायींना चारा खाऊ घातला. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते अगदी छोट्या उंचीच्या गायींना चारा खाऊ घालताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी ज्या गायींना चारा खाऊ घातला त्या ‘पुंगनूर’ प्रजातीच्या आहेत. गायींची ही प्रजाती आंध्र प्रदेशमध्ये आढळून येते. त्यांची उत्पत्ती दक्षिण भारतामधील पुंगनूर प्रांतात झाल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांना हे नाव पडले आहे. ‘जगातील सर्वात कमी उंचीच्या गायी’ म्हणून या प्रसिद्ध आहेत. असे मानले जाते की पुंगनूर गायींच्या दुधामध्ये सोन्याचा अंश असतो. इथे सोनं ‘धातू’ म्हणून अपेक्षित नसून ‘रासायनिक तत्त्व’ अशा अर्थाने आहे.

आजही आंध्र प्रदेशामधील अनेक मंदिरांमध्ये पुंगनूर गायींच्या दुधाचा अभिषेक घातला जातो. तिरुपती मंदिराच्या क्षीराभिषेकामध्येही या पुंगनूर गायीच्या दुधाचा वापर केला जातो. या दिव्य स्वरुपातील गायी असल्याचे मानले जाते. या गायी अतिशय शांत असतात व त्या लवकर माणसाळतात. पुंगनूर गायीचे दूध अतिशय पौष्टिक मानले जाते. या दुधामध्ये फॅटस्चे प्रमाण अधिक असते. जवळपास 8 टक्के फॅट या गायीच्या दुधात असते. इतर गायींच्या दुधात हेच प्रमाण 3 ते 4 टक्के इतके असते.

Back to top button