खड्ड्यातून रुग्णवाहिका जाताच ‘मृत’ व्यक्ती झाली जिवंत! | पुढारी

खड्ड्यातून रुग्णवाहिका जाताच ‘मृत’ व्यक्ती झाली जिवंत!

चंदिगढ : चंद्रावरील खड्डे आणि अनेक शहरांमधील रस्त्यावरील खड्डे यामध्ये काही फरक नाही. अनेक वेळा हे खड्डे जीवघेणेही ठरलेले आहेत. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही; पण असे प्रत्यक्षात घडले आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी हा खळबळजनक दावा केला आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी या 80 वर्षीय व्यक्तीला मृत घोषित केले होते. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय त्यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असताना एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका अडकली. या जोरदार धक्क्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीराची अचानक हालचाल सुरू झाली. त्यानंतर नातेवाईकांनी त्या वृद्धाला पुन्हा रुग्णालयात नेले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हरियाणातील पटियाला येथील रुग्णालयात डॉक्टरांनी दर्शन सिंग ब्रार यांना मृत घोषित केले होते.

ब्रार यांच्यावर त्यांच्या मूळ गावी निसिंग येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे ब्रार यांचा नातू त्याच्या मृत आजोबांच्या मृतदेहासह रुग्णवाहिकेतून निघाला होता. पटियालाहून कर्नालला जात असताना रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे रुग्णवाहिका जोरात आदळली. यानंतर आजोबांचा हात थरथरत असल्याचे नातवाने पाहिले. त्याने लगेचच ब्रार यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तीन तासांपूर्वीच ब्रार यांना मृत घोषित केले होते. मात्र, नातवाने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि ब्रार यांना जिवंत घोषित केले.

Back to top button